Shriniwas Patil | (Photo Credit: Archived, edited, representative images)

Satara Lok Sabha By-Election: सातारा लोकसभा मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेस(NCP), काँग्रेस (Congress) आघाडीतर्फे अखेर श्रीनिवास पाटील (Shriniwas Patil) यांना उमेदवारी देण्यात आली आहे. विद्यमान खासदारकीचा राजीनामा देऊन भाजप प्रवेश केलेल्या उदयनराजे भोसले (Udayanraje Bhosale) यांच्याविरोधा आघाडीचा उमेदवार कोण? याबाबत गेली प्रदीर्घ काळ चर्चा आणि उत्सुकात होती. सुरुवातीच्या काळात माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेस नेते पृथ्वीराज चव्हाण यांचे नाव चर्चेत होते. त्यानंतर काही काळ राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांचेही नाव चर्चेत होते. परंतू, श्रीनिवास पाटील यांची उमेदवारी जाहीर झाली आणि ही उत्सुकता संपली. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने मंगळवारी (1 ऑक्टोबर 2019) ही घोषणा केली.

श्रीनिवास पाटील हे येत्या 3 ऑक्टोबर रोजी आपला उमेदवारी अर्ज दाखल करतील. उदयनराजे भोसले यांनी भाजप प्रवेश केल्यामुळे त्यांच्याविरोधा आघाडीतर्फे प्रबळ उमेदवार शोधला जात होता. श्रीनिवास पाटील यांच्या रुपात उदयनराजे भोसले यांच्यासमोर एक तगडा उमेदवार मिळाला आहे. त्यामुळे उदयनराजे भोसले विरुद्ध श्रीनिवास पाटील हा सामना मोठा चुरशीचा होणार असे मानले जात आहे.

श्रीनिवास पाटील हे या पूर्वी खासदार राहिले आहेत. तसेच, ते सिक्कीम राज्याचे राज्यपालही राहिले आहेत. प्रशासकीय कामाचा त्यांचा दांडगा अनुभव आहे. ते मुळचे पाटणचे आहेत. त्यांचा जन्म एका सर्वसामान्य कुटुंबात झाला. कर्मवीर भाऊराव पाटील आणि क्रांतिसिह नाना पाटील यांचा त्यांना सहवास लाभला. तर, शिक्षणासाठी पुण्यात आल्यावर यशवंतराव चव्हाण,धनंजयराव गाडगीळ यांचाही सहवास त्यांना प्रदीर्घ काळ लाभला. (हेही वाचा, उदयनराजे भोसले, शिवेंद्रराजे यांचे सातारा शहरात शक्तीप्रदर्शन; लोकसभा, विधानसभा निवडणुकीसाठी भाजप तिकीटावर दाखल करणार अर्ज)

दरम्यान, छत्रपती उदयनराजे भोसले आणि शिवेंद्रराजे भोसले हे आज (मंगळवार, 1 ऑक्टोबर 2019) अनुक्रमे लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीसाठी अर्ज भरत आहेत. दोन्ही नेते सातारा (Satara) शहरात मोठे शक्तीप्रदर्शन करत भाजप तिकीटावर अर्ज दाखल करत आहेत. महत्त्वाचे म्हणजे उदयनराजे आणि शिवेंद्रराजे एकत्रीत शक्तिप्रदर्शन करत प्रथमच निवडणूक अर्ज दाखल करत आहेत. ज्या सातारा शहराने आजवर दोघांचा संघर्ष पाहिला आहे. तेच सातारा शहर दोघांची दिलजमाई अनुभवत आहे.