छत्रपती उदयनराजे भोसले (Udayanraje Bhosale) आणि शिवेंद्रराजे भोसले (Shivendra Raje Bhosale) हे आज (मंगळवार, 1 ऑक्टोबर 2019) अनुक्रमे लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीसाठी अर्ज भरत आहेत. दोन्ही नेते सातारा (Satara) शहरात मोठे शक्तीप्रदर्शन करत भाजप तिकीटावर अर्ज दाखल करत आहेत. महत्त्वाचे म्हणजे उदयनराजे आणि शिवेंद्रराजे एकत्रीत शक्तिप्रदर्शन करत प्रथमच निवडणूक अर्ज दाखल करत आहेत. ज्या सातारा शहराने आजवर दोघांचा संघर्ष पाहिला आहे. तेच सातारा शहर दोघांची दिलजमाई अनुभवत आहे.
दरम्यान, मोठ्या शक्तीप्रदर्शन करत अर्ज दाखर करण्यापूर्वी उदयनराजे भोसले यांनी पत्रकार परिषद घेतली. या पत्रकार परिषदेत शरद पवार यांच्यासोबत आपला कोणताही संघर्ष नाही. पण, जे काही प्रश्न होते ते आपण पवार यांच्या कानावर घातले होते. पण, ते न सुटल्याने कधी कधी काही निर्णय घ्यावे लागतात, असे उदयनराजे भोसले यांनी सांगितले.
लोकसभा निवडणूक झाल्यानंतर अवघ्या तीन महिन्यांतच उदयनराजे भोसले यांनी आपल्या खासदारकीचा राजीनामा दिला. त्यामुळे रिक्त झालेल्या जागेसाठी सातारा लोकसभा मतदारसंघात पोटनिवडणूक लागली आहे. लोकसभा निवडणुकीत तीन महिन्यांपूर्वी उदयनराजे हे राष्ट्रवादी काँग्रेसच्या तिकीटावर निवडूण आले होते. मात्र, खासदारकीचा आणि राष्ट्रवादी काँग्रेस सदस्यत्वाचा राजीनामा देत उदयनराजे यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. (हेही वाचा, सातारा: शरद पवार यांच्या भाषणात उदयनराजे भोसले यांचा अनुल्लेख)
दरम्यान, शिवेंद्र राजे भोसले यांनीही आपल्या विधानसभा सदस्यत्वाचा राजीनामा देत भाजप प्रवेश केला. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये असलेले हे दोन्ही नेते आज भाजपतर्फे निवडणूक अर्ज भरत आहे. दोन्ही नेते प्रथमच एकत्र शक्तिप्रदर्शन करत निवडणूक अर्ज भरत आहेत. त्यामुळे दोन्ही नेत्यांच्या कार्यकर्त्यांमध्ये मोठा उत्साह पाहायला मिळत आहे.