उद्धव ठाकरे यांच्या मंत्रिमंडळात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अजित पवार उपमुख्यमंत्री-मीडिया रिपोर्ट
Uddhav Thackeray, Uddhav Thackeray | (Photo Credit: Archived, Edited And Representative images)

शिवसेना-राष्ट्रवादी काँग्रेस-काँग्रेस महाविकास आघाडीत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे ( Uddhav Thackeray) हे मुख्यमंत्री तर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे बंडखोर नेते अजित पवार (Ajit Pawar) हे उपमुख्यमंत्री (Deputy Chief Minister) असण्याची शक्यता आहे. उद्धव ठाकरे मुख्यमंत्री होणार हे आगोदरच निश्चित झाले होते. मात्र, राष्ट्रवादीतून उपमुख्यमंत्रीपदाचा चेहरा अद्याप ठरला नव्हता. अजित पवार यांचे बंड आणि घरवापसी पाहता जयंत पाटील यांचे नाव चर्चेत होते. दोन्ही नेत्यांमध्ये उपमुख्यमंत्री पदासाठी चुरस असल्याचे चित्र प्रसारमाध्यमांतील वृत्तांमधून दिसत होते. त्यात पाटील यांच्या नावावर अधिक जोर होता. दरम्यान, एबीपी माझा या वृत्तवाहिणीने वृत्त दिले आहे की, अजित पवार हे उपमुख्यमंत्री होणार आहेत.

महाविकास आघाडीत उपमुख्यमंत्री पद आणि विधानसभा अध्यक्षपदावरुन जोरदार रस्सीखेच होती. राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस या दोन्ही पक्षांनी विधानसभा अध्यक्षपदावर दावा सांगितला होता. दोन्ही पक्षांनी भूमिका घेतली होती की, एकवेळ उपमुख्यमंत्रीपद नको पण, विधानसभा अध्यक्षपद हवे. अखेर शेवटी विधानसभा अध्यक्षपद काँग्रेस पक्षाकडे तर, उपमुख्यमंत्री पद हे राष्ट्रवादी पक्षाकडे आले.

महाविकास आघाडी सत्तेवर आल्यास राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून उपमुख्यमंत्री म्हणून अजित पवार यांचेच नाव चर्चेत होते. मात्र, सर्व काही सुरळीत चालले असताना मध्येच अजित पवार यांनी बंड केले आणि ते भाजपसोबत गेले. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस आणि महाराष्ट्रात एकच खळबळ उडाली. अखेर निकराचे प्रयत्न केल्यानंतर अजित पवार राष्ट्रवादीत स्वगृही परतले. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात अजित पवार यांचे वजन पहिल्यासारखे राहणार नाही. त्यांना उपमुख्यमंत्रीपद दिले जाणार नाही, असे बोलले जात होते. (हेही वाचा, उद्धव ठाकरे यांच्यासोबत आज राष्ट्रवादी कॉंंग्रेसचे छगन भुजबळ घेणार मंत्रीपदाची शपथ)

अजित पवार यांचे बंड शमून ते पुन्हा स्वगृही परतले. त्यानंतर ते पक्षात सक्रीयही झाले होते. मात्र, आज पुन्हा एकदा सकाळी प्रसारमाध्यमांतून वृत्त आले की, अजित पवार यांचा फोन नॉट रिचेबल येतो आहे. अजित पवार यांचा फोन नॉट रिचेबल येण्याचे अनेक अर्थ काढले जात होते. मात्र, काही वेळातच बातमी आली की, सुप्रिया सुळे आणि अजित पवार यांचा संपर्क होत आहे. दोघे बोलत आहेत. शपथविधी सोहळ्यालाही हे दोघे मिळूनच उपस्थिती लावणार आहे. दरम्यान, काही वेळात पुन्हा एकदा वृत्त आले की, अजित पवार हे उपमुख्यमंत्री होणार आहेत.