महाराष्ट्रात कोरोना विषाणूने धुमाकूळ घातलेला असताना राज्यातील राजकारणाने पेट घ्यायला सुरुवात केली आहे. कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर सत्ताधारी पक्ष आणि विरोधकांमध्ये चांगली जुंपली आहे. दरम्यान, केंद्रीय सरंक्षण मंत्री आणि भाजप नेते राजनाथ सिंग (Rajnath Singh) यांनी महाविकास आघाडीच्या (Maha Vikas Aghadi) कामगिरीवर प्रश्नचिन्ह उपस्थित करत त्यांच्यावर बोचरी टीका केली होती. त्यावेळी त्यांनी राष्ट्रवादी अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांच्या अनुभवाचा देखील उल्लेख केला होता. तसेच महाराष्ट्रात सरकारच्या नावाखाली सर्कस सुरु आहे, असेही ते म्हणाले होते. राजनाथ सिंग यांच्या टिकेला शरद पवार यांनी सणसणीत उत्तर दिले आहे. आमच्या सर्कशीत प्राणी आहेत फक्त विदुषकाची कमतरता आहे असे म्हणत शरद पवार यांनी राजनाथ सिंग यांना सणसणीत टोला लगावला आहे.
आजपासून दोन दिवस शरद पवार हे कोकण दौऱ्यावर आहेत. निसर्ग चक्रीवादळामुळे झालेल्या नुकसानीची पाहणी त्यांनी केली आहे. त्यानंतर त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. पत्रकारांनी जेव्हा शरद पवार यांना राजनाथ सिंग यांच्याबाबत प्रश्न विचारला होता. त्यावेळी शरद पवार म्हणाले की, आमच्या सर्कशीत प्राणी आहेत फक्त विदुषकाची कमतरता आहे. एवढेच नाही तर, त्यांनी भाजपाच्या नेत्यांचा चांगलाच समाचार घेतला आहे. 'भाजपाच्या लोकांनी कोकणाचे दौरे वगैरे केले, त्यांनी नारळाची अनेक झाडेही उभी केली याचा मला आनंद आहे' असेही शरद पवार म्हणाले आहेत. हे देखील वाचा- शिवसेना आजही बाळासाहेबांचीच, पण भाजपा अटल बिहारी वाजपेयी यांची राहीलीय का?; राजनाथ सिंह यांना खासदार अरविंद सावंत यांचे प्रत्युत्तर
भाजपाच्या व्हर्चुअल रॅलीत राजनाथ सिंग यांनी शरद पवार आणि महाराष्ट्र सरकारवर टीका केली होती. 'महाराष्ट्रात सरकारच्या नावाखाली सर्कस सुरु आहे. करोनाच्या संकटात जे काही महाराष्ट्रात सुरु आहे ते चांगले नाही. शरद पवार यांच्यासारख्या जाणकाराच्या हाती या सरकारची सूत्रे आहेत तरीही असे घडते आहे, याचे आश्चर्य वाटत आहे. महाराष्ट्रात सरकार नावाची काही गोष्ट अस्तित्त्वात आहे का? असाही प्रश्न पडतो.' असे राजनाथ सिंह म्हणाले आहेत.