सरकारच्या नावाखाली महाराष्ट्रात सर्कस सुरु आहे. बाळासाहेब ठाकरे (Balasaheb Thackeray) यांची शिवसेना (Shiv Sena) आता राहीली नाही, अशी टीका करणाऱ्या केंद्रीय मंत्री राजनाथ सिंह (Rajnath Singh) यांना शिवसेना खासदार अरविंद सावंत (Arvind Sawant) यांनी जोरदार प्रत्युत्तर दिले आहे. राजनाथ सिंह यांच्या टीकेला उत्तर देताना अरविंद सावंत यांनी म्हटले आहे की, शिवसेना आजही बाळासाहेबांचीच आहे. पण, शब्द न पाळणारा आजचा भाजपा अटल बिहारी वाजपेयी यांचा राहिला आहे काय? असा सवाल खा. सावंत यांनी विचारला आहे.
अरविंद सावंत यांनी ही राजकारण करण्याची वेळ नाही याची जाणीव करुन देत तुम्ही आम्हाला शिकवून नये, असे सावंत यांनी राजनाथ सिंह यांना प्रत्युतर दिले. तसेच, बिहारचा बिगुल वाजवताना तुम्ही 70 हजार एलईडी लावले. पीएम केअर फंडाचे काय झाले ते सांगा, असेही सावंत यांनी या वेळी म्हटलं. (हेही वाचा, मीरा भाईंदर: शिवसेना नगरसेवक हरिश्चंद्र आंमगावकर यांचा कोरोना व्हायरसमुळे मृत्यू)
अरविंद सावंत म्हणाले, “तुम्ही राजकारणात व्यापार मांडलाय. तो पहा मध्यप्रदेश, गुजरात, जम्मू-काश्मीर कर्नाटकात तुम्ही काय केलं. तुम्ही अंतर्मुख झालं पाहिजे. आम्हीच तुम्हाला प्रश्न विचारतो की हा अटल बिहारी वाजपेयी, लालकृष्ण अडवाणी यांचा भाजप आहे का? शिवसेना आणि सत्ता असं काही नाही. सत्ता हे आमचं साधन आहे साध्य नाही. वंदनीय शिवसेना पक्षप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची शिवसेना तशीच आहे. त्याच विचारांनी काम करत आहे.”
पुढे बोलताना अरविंद सावंत यांनी म्हटले की, राजनाथ सिंह हे ज्येष्ठ नेते आहेत. त्यांच्यावर टीका करण्याइतका मी मोठा नाही. परंतू, ते जेव्हा शिवसेनेवर बोलतात तेव्हा दु:ख होतं. त्यामुळे ते जेव्हा शिवसेनेवर बोलतात तेव्हा काही गोष्टी स्पष्टपणे बोलाव्या, सांगाव्या लागतात असेही सावंत म्हणाले. शिवसेनेने आयुष्यात कधी कोणाला धोका दिला नाही. पण, शिवसेनेला मात्र अनेकांनी धोका दिला आहे, असा टोलाही सावंत यांनी या वेळी लगावला.