Image Used for Representational Purpose Only | (Photo Credits: PTI)

नवी मुंबईच्या आंतरराष्ट्रीय विमानतळाला (Navi Mumbai International Airport) शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे (Balasaheb Thackeray) यांचे नाव न देता रायगडचे प्रकल्पग्रस्त नेते दिवंगत दि. बा. पाटील यांचे नाव द्यावे, अशी मागणी मनसेने (MNS) केली आहे. यापूर्वी पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी नवी मुंबई विमानतळाला शिवसेना प्रमुखांचे नाव देण्याची मागणी केली होती. मात्र याला मनसेने ठामपणे विरोध केला आहे. त्यामुळे पुन्हा एकदा शिवसेना-मनसे (ShivSena Vs MNS) वाद रंगणार आहे. दरम्यान, महाराष्ट्रात सध्या नामांतर वाद रंगत असल्याचे दिसून येत आहे. औरंगाबाद जिल्ह्याचे नाव बदलून संभाजीनगर करण्यावरुन रंगलेला वाद कायम असताना आता नवी मुंबई विमानतळाच्या नावावरुन वाद उद्भवण्याची चिन्हं दिसू लागली आहेत.

शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे जसे महाराष्ट्राचे दैवत आहेत. तसेच रायगडवासियांसाठी दि.बा. पाटील साहेब दैवत आहेत. त्यांच्यामुळे प्रकल्पग्रस्तांचा लढा उभा राहिला. त्यामुळे या विमानतळाला केवळ त्यांचेच नाव द्यावे, अशी मागणी मनसेने केली आहे. त्याचबरोबर नवी मुंबई विमानतळाला दि.बा. पाटील साहेबांचे नाव द्यावे अशी रायगडवासिय, नवी मुंबईकर आणि स्थानिक आग्री-कोळी समाज यांचीही भावना असल्याचे मनसेचे नवी मुंबई प्रमुख गजानन काळे यांनी सांगितले आहे.

पनवेल मध्ये उभे राहणारे आंतरराष्ट्रीय विमानतळ रायगड जिल्ह्यात आहे या भूमीला प्रकल्पग्रस्त चळवळीचा इतिहास आहे. त्यामुळे केवळ प्रकल्पग्रस्तांसाठी आयुष्य वेचणारे नेते दि. बा. पाटील यांचे नवी विमानतळाला द्यावे, असे मनसेचे म्हणणे आहे. अशीच मागणी भाजप कडून करण्यात आली असून मनसेने देखील यात भाजपच्या बाजूने आहे. (MNS: वाढीव वीज बिलांवरुन मनसे आक्रमक! मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या निवासस्थानाबाहेर बॅनर लावून राज्य सरकारवर केली टीका)

दरम्यान, राज्यात यापूर्वी औरंगाबाद च्या नामांतरणावरुन वाद सुरु आहे. औरंगाबादचे नाव संभाजीनगर करण्याच्या मुद्द्यावरुन विरोधक आक्रमक झाले असून 26 जानेवारीपूर्वी नावात बदल न केल्यास आंदोलन करण्याचा इशारा मनसेने दिला आहे.