MNS: वाढीव वीज बिलांवरुन मनसे आक्रमक! मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या निवासस्थानाबाहेर बॅनर लावून राज्य सरकारवर केली टीका
Raj Thackery, Uddhav Thackeray (Photo Credit: Facebook)

लॉकडाऊन काळात राज्यातील नागरिकांना आलेले वाढीव वीज बिलांवरुन महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने (MNS) आक्रमक पवित्रा घेतला आहे. वीज बिलांमध्ये सवलत देण्याचे आश्वासन देण्यात आले होते. मात्र, तशी कोणतीही सवलत देण्यात आली नाही, असा आरोप करत मनसेने राज्य सरकारविरोधात मोर्चा काढला होता. याच मुद्द्यावरून मनसेच्या कार्यकर्त्यांनी आता मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्या निवासस्थानाबाहेर बॅनर लावून राज्य सरकारवर टीकास्त्र सोडले आहे. मुख्यमंत्री साहेब सरकार निर्दयी कसे काय झाले? असा प्रश्नही त्यांनी बॅनरच्या माध्यमातून विचारला आहे.

मुख्यमंत्री महोदय गोड बोलता बोलता एक नवीन वर्ष आले, गोड बातमी तर दूर राहिली पण जनतेचे हाल झाले. जनतेच्या खिशात पैसा नाही तर वीज बिल भरा उर्जामंत्री म्हणाले, मुख्यमंत्री साहेब सरकार इतके निर्दयी कसे काय झाले? असा मजकूर लिहून मनसेने मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंवर टीका केली आहे. हे देखील वाचा- 'सामना' च्या अग्रलेखातील भाषेबाबत वृत्तपत्राच्या संपादिका रश्मी ठाकरे यांना पत्र लिहिणार- चंद्रकांत पाटील

ट्विट-

वाढीव वीज बिल प्रकरणी मनसेने 27 नोव्हेंबरला राज्यभरात ‘झटका मोर्चा’चे आयोजन केले होते. मुंबई, नवी मुंबई, ठाणे, पुणे, औरंगाबाद, नाशिक अशा विविध जिल्ह्यात मनसेचे कार्यकर्ते रस्त्यावर उतरले होते. दरम्यान, सरकार जर गंभीर असेल तर दखल घेईल, जर गंभीर नसेल तर मनसे त्यांच्या भाषेत इथून पुढे आंदोलन करेल, असा इशारा मनसेचे सरचिटणीस संदीप देशपांडे यांनी त्यावेळी दिला होता.