'सामना' च्या अग्रलेखातील भाषेबाबत वृत्तपत्राच्या संपादिका रश्मी ठाकरे यांना पत्र लिहिणार- चंद्रकांत पाटील
Chandrakant Patil And Rashmi Thackeray (Photo Credits: PTI)

सामनाच्या (Saamana) अग्रलेखातून नेहमीच कुणा ना कुणावर टिका केली जात असते. यात भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांच्यावर अनेकदा टिका करण्यात आली आहे. त्यामुळे या सर्व टिकेचा आणि त्यात वापरलेल्या भाषेचा चंद्रकांत पाटील यांनी निषेध केला आहे. "या संदर्भात आपण सामनाच्या संपादिका रश्मी ठाकरे (Editor Rashmi Thackeray) यांना पत्र लिहिणार" असल्याचे चंद्रकांत पाटील यांनी सांगितले. ते पुण्यात बोलत होते. अनेकदा सांगून सामनामधून आपल्यावर गलिच्छ भाषेत अग्रलेख लिहिले जातात असेही ते यावेळी म्हणाले.

"सामनातून माझ्यावर गलिच्छ भाषेत अग्रलेख लिहिला होता. आताही संजय राऊत यांच्या पत्नीला ईडीची नोटीस आल्यावर जी भाषा वापरली त्याबाबत मी रश्मी वहिनींना पत्र लिहिणार आहे. तुम्ही 'सामना'च्या संपादिका आहात, म्हणजे हा अग्रलेख तुमच्या नावाने लागतो. ही तुमची भाषा असू शकत नाही. मग अग्रलेखात ही भाषा कशी? असा प्रश्न त्यांना विचारणार आहे." असे चंद्रकांत पाटील यावेळी म्हणाले.हेदेखील वाचा- Sanjay Raut Tweets to Amit Shah: संजय राऊत यांचा इशारा 'आता बस्स!; आरोप सिद्ध करा किंवा कायदेशीर कारवाईला सामोरे जा'

शिवसेना खासदार संजय राऊत यांच्या पत्नी वर्षा राऊत यांना ईडीची नोटिस आल्यानंतर भाजपने शिवसेनेवर जोरदार हल्लाबोल केला होता. त्यावर राजकीय भडास काढण्यासाठी भाजप केंद्रीय यंत्रणांचा वापर करत आहे, असं राऊत म्हणाले होते. यादरम्यान भाजप नेत्यांवर सामनाच्या अग्रलेखातून जहरी टिका करण्यात आली होती. यात आपल्यावर अर्वाच्य भाषेत टिका केली होती. या संबंधी आपण संपादिका रश्मी ठाकरे यांना पत्राच्या माध्यमातून काहीतरी पाऊल उचलावे असे सांगणार आहोत.

दरम्यान औरंगाबादचं नाव बदलून संभाजीनगर करणं हा आमचा राजकीय मुद्दा नाही, निवडणुकीचा नाही तर भावनिक मुद्दा आहे. काँग्रेसचा विरोध संभाजी महाराजांच्या नावाला आहे का? समजा असेल तर औरंगजेबाचं तरी नाव कशाला? ते आधी हटवा, असं चंद्रकांत पाटील म्हणाले. नामांतराची सर्वप्रथम मागणी बाळासाहेब ठाकरेंनी केली. तुम्ही गोधड्या वाळवत आहात असं आम्हाला म्हणता तर आता करा नामांतर, असं आव्हानही त्यांनी दिलं. सोबतच नामांतराला

काँग्रेसचा विरोध आहे, शिवसेनेला नामांतर करायचं आहे, पण या विषयात आम्हाला पडायचं नाही. पण औरंगाबादचं नामांतर संभाजीनगर झालं पाहिजे ही आमची 100 टक्के भूमिका आहे," असंही पाटील म्हणाले.