
महाराष्ट्राची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबईला (Mumbai) लवकरच एक नवीन आंतरराष्ट्रीय विमानतळ मिळणार आहे, ज्यामुळे शहराची हवाई वाहतूक क्षमता दुप्पट होईल आणि नवी मुंबई परिसराचा कायापालट होईल. नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ (NMIA), ज्याला ‘लोकनेते डी. बी. पाटील नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ’ असे नाव देण्यात आले आहे, हा पनवेलजवळ उभारला जाणारा एक महत्त्वाकांक्षी प्रकल्प आहे. याची खास बाब म्हणजे, हा भारतातील पहिला आंतरराष्ट्रीय विमानतळ असेल जिथे वॉटर टॅक्सी सेवा उपलब्ध असेल, असे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ हा सिटी अँड इंडस्ट्रियल डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन (CIDCO) च्या नेतृत्वाखाली आणि अडाणी ग्रुपच्या सहभागाने सार्वजनिक-खासगी भागीदारी (PPP) मॉडेलद्वारे विकसित होत आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला ‘मल्टी मॉडेल ट्रान्सपोर्ट कनेक्टिव्हिटी’ निर्माण करण्याचे निर्देश दिले. या विमानतळाला वॉटर टॅक्सीची सुविधा उपलब्ध करून द्यावी. अशी सुविधा असणारे हे देशातील पहिलेच आंतरराष्ट्रीय विमानतळ ठरणार आहे, असेही मुख्यमंत्र्यांनी यावेळी सांगितले.
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर सामान्य विमान वाहतुकीची व्यवस्था सर्वप्रथम निर्माण करण्याचे सूचित करीत, मुख्यमंत्री म्हणाले, जगभरातून लोक मुंबईमध्ये विमाने आणत असतात. त्यामुळे पार्किंगची चांगली सुविधा या विमानतळावर उपलब्ध असायला पाहिजे. यासोबतच विमान दुरुस्तीची सुविधाही विमानतळावर असावी. विमानतळाला रस्ते, रेल्वे, मेट्रो आणि जलवाहतुक ‘कनेक्टिव्हिटी’ ची कामे वेळेत पूर्ण करावीत. शहर आणि औद्योगिक विकास महामंडळच्या अधिकाऱ्यांसोबत झालेल्या एका महत्त्वाच्या बैठकीत, फडणवीस यांनी एकात्मिक आणि पर्यावरणपूरक शहरी पायाभूत सुविधांच्या गरजेवर भर दिला. (हेही वाचा: Mumbai Metro 3 Phase 2A: मुंबईकरांसाठी आनंदाची बातमी! बीकेसी ते वरळीला जोडणारा मेट्रो 3 फेज 2ए मार्ग लवकरच कार्यान्वित होणार; 1-2 मे दरम्यान उद्घाटन होण्याची शक्यता)
त्यांनी नवी मुंबईला बहुआयामी वाहतूक व्यवस्था आणि सौर ऊर्जेच्या वाढीव वापराने समृद्ध, शाश्वत शहर म्हणून विकसित करण्यात सिडकोची महत्त्वाची भूमिका अधोरेखित केली. हे विमानतळ मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावरील ताण कमी करेल, जो सध्या पूर्ण क्षमतेने कार्यरत आहे. नवी मुंबई विमानतळाची क्षमता मुंबई विमानतळाच्या दुप्पट असेल, आणि यामुळे नवी मुंबई, पनवेल आणि रायगड परिसरातील आर्थिक वाढीला चालना मिळेल. लवकरच हे विमानतळ जनतेसाठी सुरु होईल.