महाराष्ट्रामध्ये समृद्धी द्रुतगती मार्गाद्वारे नागपूर ते मुंबई (Nagpur-Mumbai) या दोन महत्वाच्या शहरांमधील अंतर कमी झाल्यानंतर आता नागपूर व पुणे (Nagpur-Pune) या शहरांमधील अंतर कमी होणार आहे. लवकरच नागपूर ते पुणे हा प्रवास अवघ्या 8 तासांत पूर्ण होणार आहे. सध्या हा प्रवास कव्हर करण्यासाठी 14 तास लागतात. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी (Nitin Gadkari) यांनी याबाबत माहिती दिली. त्यांनी केलेल्या महत्त्वाकांक्षी घोषणेनुसार, बाळासाहेब ठाकरे समृद्धी महामार्गला नवा मार्ग जोडला जाणार आहे. याद्वारे पुण्याहून नागपूर किंवा नागपूर ते पुणे 8 तासात पोहोचणे शक्य होणार आहे.
गडकरींनी त्यांच्या ट्विटर हँडलवरून ही घोषणा केली. सध्या नागपूर ते मुंबई म्हणजेच महाराष्ट्रातील दोन महत्त्वाची शहरे जोडणारा बाळासाहेब ठाकरे समृद्धी महामार्ग चर्चेत आहे. आता नागपूर-पुणे हे अंतर कमी करण्यासाठी पुणे ते छत्रपती संभाजीनगर असा नवा मार्ग तयार करण्यात येणार आहे. पुणे ते औरंगाबाद (छत्रपती संभाजीनगर) ऍक्सेस कंट्रोल ग्रीन एक्स्प्रेस वे तयार केला जाईल आणि तो औरंगाबादजवळील समृद्धी महामार्गशी जोडला जाईल.
या महामार्गामुळे पुणे ते औरंगाबाद (छत्रपती संभाजीनगर) हा प्रवास अडीच तासांत तर पुढे समृद्धी महामार्गावरून नागपूर-औरंगाबाद प्रवास साडेपाच तासांत शक्य होणार आहे. सध्या नागपूर ते पुणे प्रवास करताना प्रवाशांची होणारी गैरसोय लक्षात घेता नागपूर-मुंबई समृद्धी महामार्ग हा छत्रपती संभाजीनगरजवळ नव्याने प्रस्तावित पुणे-संभाजीनगर (औरंगाबाद) ऍक्सेस कंट्रोल ग्रीन एक्स्प्रेस वेशी जोडला जाणार आहे, असे नितीन गडकरी म्हणाले. (हेही वाचा: पंढरपूरकडे निघालेल्या वारकऱ्यांना वाहनाने चिरडले, 6 जणांचा मृत्यू; CM Eknath Shinde यांच्याकडून मृतांच्या कुटुंबियांना 5 लाखाची मदत जाहीर)
हा रस्ता भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण (NHAI) द्वारे बांधला जाणार आहे. दरम्यान, नुकतेच गडकरी म्हणाले होते की, जर कोणी रस्त्यावर चुकीच्या पद्धतीने पार्क केलेल्या वाहनाचा फोटो पाठवला तर त्याला 500 रुपयांचे बक्षीस दिले जाईल. केंद्रीय मंत्र्यांनी सांगितले की, जर एखाद्या व्यक्तीने आपले वाहन चुकीच्या पद्धतीने पार्क केले असेल, तर त्याला या चुकीसाठी 1000 रुपये दंड आकारला जाईल.