Nagpur: नागपुरातील शहरी झोपडपट्ट्यांमधील 10 पैकी 4 घरांमध्ये स्वयंपाकासाठी अजूनही चुलींचा वापर- Survey
चुलीवर जेवण (Photo Credit : Youtube)

देशात दरवर्षी वायू प्रदूषणामुळे (Air Pollution) हजारो लोकांचा मृत्यू होतो. वायू प्रदूषणाला कारणीभूत असणाऱ्या गोष्टींमध्ये लाकडी इंधनाचा वापर हा देखील एक महत्वाचा घटक आहे. देशात गरीब कुटुंबातील महिलांसाठी प्रधानमंत्री उज्ज्वला योजना राबवली जात असूनही, आजही अनेक कुटुंबे चुलीवर स्वयंपाक करत आहेत. नितीन गडकरी, देवेंद्र फडणवीस यांच्या नागपूरमध्ये (Nagpur) याबाबत एक सर्वेक्षण करण्यात आले होते, ज्यामध्ये आढळून आले आहे की, आजही शहरी झोपडपट्ट्यांमधील 10 पैकी 4 कुटुंबे एलपीजी कनेक्शन असूनही स्वयंपाक आणि अन्न गरम करण्यासाठी चुलीचा वापर करत आहेत.

नागपुरातील सिद्धेश्वरी झोपडपट्टीत राहणारी 20 वर्षांची पूनम तिच्या पाच जणांच्या कुटुंबासाठी घरगुती चुलीवर (विटांच्या चुलीवर) स्वयंपाक बनवते. 8,000 रुपयांचे तुटपुंजे मासिक उत्पन्न असलेल्या नऊ महिन्यांच्या या गर्भवती महिलेला दरमहा एलपीजी सिलेंडर भरणे परवडत नाही. यामुळे आता चुलीतून निघणाऱ्या विषारी वायुमुळे तिला आणि तिच्या जन्मा येणाऱ्या बाळाच्या आरोग्याला गंभीर धोका निर्माण झाला आहे.

अशा प्रकारे नागपूर येथे परवडणाऱ्या स्वच्छ इंधनाअभावी झोपडपट्टीमधील 43 टक्के महिलांना चुलीवर स्वयंपाक करावा लागत आहे. वॉरियर मॉम्स (Warrior Moms)- देशव्यापी मातांचे नेटवर्क आणि सेंटर फॉर सस्टेनेबल डेव्हलपमेंट (CFSD) यांनी केलेल्या सर्वेक्षणात हे आढळून आले आहे. नागपुरातील 12 झोपडपट्टी वसाहतींमध्ये हे सर्वेक्षण करण्यात आले आणि त्यात 1,500 कुटुंबांचा समावेश करण्यात आला.

यामध्ये आढळून आले की 43 टक्के प्रतिसादकर्ते एलपीजी आणि चुल दोन्ही वापरतात तर 57 टक्के प्रतिसादकर्ते फक्त एलपीजी वापरतात. सुमारे 7 टक्के प्रतिसादकर्त्यांनी सांगितले की ते फक्त चुली वापरतात. यामध्ये चुली वापरणाऱ्या 81 टक्के उत्तरदात्यांचे म्हणणे आहे की, केवळ एलपीजी वापरणाऱ्या 23 टक्के प्रतिसादकर्त्यांच्या तुलनेत त्यांना खोकल्याचा त्रास आहे. त्याचप्रमाणे, चूल वापरणाऱ्या 65 टक्के प्रतिसादकर्त्यांना डोळ्यांची जळजळ होत आहे.

चुलीसाठी मुख्यत्वे घरातील महिला सरपण गोळा करतात, यासाठी दर आठवड्याला त्या 4 ते 5 तास खर्च करतात. बहुतेक कुटुंबांनी हिवाळ्यात गरम पाण्याची अतिरिक्त गरज पूर्ण करण्यासाठी चुलीचा वापर वाढल्याचे नोंदवले. या सरपणासाठी दर महिन्याला 100 ते 400 रुपये खर्च येतो, जे LPF सिलिंडर रिफिलसाठी सध्याच्या सुमारे 1000 च्या मासिक दरापेक्षा खूपच स्वस्त आहे. (हेही वाचा: महत्वकांक्षी उज्ज्वला योजना फसली; 85 % लाभार्थी अजूनही चुलीवर जेवण बनवतात; जाणून घ्या कारणे)

महत्वाचे म्हणजे, बहुचर्चित प्रधानमंत्री उज्ज्वला योजना (PMUY) यासह इतर स्वच्छ इंधनाबाबतच्या योजनांबद्दल लोकांमध्ये कमी जागरूकता होती. एलपीजी कनेक्‍शन असलेल्या 3 टक्‍क्‍यांहून कमी प्रतिसादकांनी त्यांनी ते पीएमयूवाय योजनेंतर्गत मिळवल्‍याची नोंद केली आहे, तर उर्वरित उत्‍तरदात्‍यांना, विशेषत: चूल वापरणार्‍यांना या योजनेची माहिती नव्हती.