
मुंबई (Mumbai) मध्ये आज पावसाने उसंत घेतली आहे. कालच्या मुसळधारेनंतर आज अधूनमधून पावसाच्या सरी बरसल्या आहे. दरम्यान हवामान विभागाने (IMD) वर्तवलेल्या अंदाजानुसार, पुढील 24 तासांसाठी मुंबई शहर आणि उपनगरांत मध्यम ते मुसळधार पाऊस बरसण्याचा अंदाज आहे. अधूनमधून 40-50 किमी ताशी वेगाने वारे वाहण्याची शक्यता आहे. तर कमाल आणि किमान तापमान अनुक्रमे ३०°C आणि २५°C च्या आसपास राहणार आहे. मुंबईला ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. त्यामुळे उद्याचे हवामान नेमके कसे राहणार आहे याचा हवामान अंदाज पहा.
मुंबई मध्ये आज जनजीवन सुरळीत आहे. शाळा, कॉलेज सुरळीत सुरू ठेवण्यात आले होते. दरम्यान मुंबईमध्ये झालेल्या मुसळधार पावसामुळे धरणक्षेत्रामध्ये पाणीसाठा चांगला वाढला आहे. मुंबईला पाणीपुरवठा करणारी 7 पैकी 4 धरणं भरून वाहू लागली आहेत. तर एकूण जलसाठा 66% पर्यंत गेला आहे. आता 29 जुलैपासून मुंबई मधील पाणीकपात देखील मागे घेतली जाणार आहे.
मुंबई मध्ये उद्याचे हवामान कसे?
हवामान विभागाच्या अंदाजपत्रानुसार यंदा देशात सरासरीच्या 106 टक्के पावसाची शक्यता असल्याचा अंदाज आहे. तसेच महाराष्ट्रातील बहुतांशी भागात सरासरीपेक्षा जास्त पावसाची शक्यता अधिक असल्याचेही हवामान विभागाने स्पष्ट केले आहे. 'एल निनो' स्थिती सुरुवातीच्या टप्प्यामध्ये तटस्थ राहू शकते. तर पावसाळ्याच्या दुसऱ्या टप्प्यात म्हणजेच जुलै किंवा ऑगस्टमध्ये 'ला निना' स्थिती निर्माण होण्याची शक्यता आहे. ला निना स्थिती देशातील यंदाच्या मॉन्सून साठी पोषक असल्याच्या नोंदी आहेत, असे हवामान विभागाने स्पष्ट केले आहे.