मुंबईतील पाणी शुल्कात (Mumbai Water Tax) 8 टक्के वाढ करण्यास बीएमसी (BMC) प्रशासनाने मंजुरी दिली आहे. कोविड-19 साथीच्या आजारामुळे बीएमसीने 2020 पासून पाणी करात वाढ केलेली नव्हती. हायड्रोलिक विभागाने दिलेला प्रस्ताव बीएमसीचे प्रशासक डॉ इक्बाल सिंग चहल यांनी स्वीकारला आहे. आता बीएमसी 16 जूनपासून सुधारित पाणी कर वसूल करू शकते. हायड्रोलिक विभागाने दिलेल्या प्रस्तावानुसार त्यांना प्रशासन शुल्कापोटी खूप जास्त खर्च करावा लागत आहे. भातसा धरणाचे पाणी आणणे, मशिन्सची देखभाल, धरणाच्या भिंती आणि वीज शुल्क यासाठी राज्य सरकारला रॉयल्टीची रक्कम भरावी लागेल. त्यामुळे आता पाणी करात वाढ करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
सध्या तरी हायड्रोलिक विभागाच्या अधिकाऱ्यांनी मंजूर प्रस्तावाची प्रत मिळाली नसल्याचे सांगितले. ती मिळाल्यावर नागरिकांना जागरुक करण्यासाठी नव्या पाणी कराचे दर नमूद करणारी जाहिरात वर्तमानपत्रात दिली जाईल.
बीएमसी मुंबईकरांना दररोज 3,950 दशलक्ष लिटर पाणी पुरवते. मुंबईत सात तलाव आहेत ज्यात सुमारे 14.50 लाख दशलक्ष लिटर पाणीसाठा आहे. धरणांची देखभाल, पाणीपुरवठा लाईन, जलशुद्धीकरण प्रक्रिया आणि धरणांची सुरक्षा यावर बीएमसी प्रशासन दरवर्षी हजारो कोटी रुपये खर्च करते. नागरी संस्था वेगवेगळ्या संस्थांना वेगवेगळे दर आकारते. घरगुती वापरकर्त्यांना नाममात्र दर आणि औद्योगिक उद्देशांसाठी आणि पाणी विकणाऱ्या कंपन्यांसाठी तुलनेने जास्त शुल्क आकारले जाते. (हेही वाचा: Maharashtra Blood Banks: महाराष्ट्रातील 93 सरकारी ब्लड बँकांवर निष्काळजीपणा बाबत कारवाई; ठोठावला लाखो रुपयांचा दंड)
याआधी 2012 मध्ये, बीएमसी स्थायी समितीने दरवर्षी 8% पेक्षा कमी दराने पाणी कर वाढविण्याचे अधिकार प्रशासनाला दिले होते. त्यानुसार दरवर्षी 16 जूनपासून प्रशासन पाणीपट्टी दरवाढ लागू करते. परंतु कोविड-19 महामारीचा विचार करता, 2020-21 आणि 2021-22 मध्ये करांमध्ये बदल करण्यात आलेला नव्हता.