मुंबईतील साकीनाका बलात्कार आणि हत्या प्रकरणामुळे राज्यभरात संताप व्यक्त केला जात आहे. तर, दुसरीकडे या प्रकरणावरुन विरोधकांनी राज्य सरकारला धारेवर धरले आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी या प्रकरणाची गंभीर दखल घेतली असून अशा प्रकारच्या घटना टाळण्यासाठी पोलीस प्रशासनाला सूचना केल्या आहेत. मुंबईमध्ये आता प्रत्येक पोलीस स्टेशनमध्ये वुमन सेफ्टी सेलची स्थापना केली जाणार आहे. तसेच निर्भया पथक उपक्रम सुरू केले जाणार आहे, असे मुंबईचे पोलीस आयुक्त हेमंत नगराळे यांनी जारी केलेल्या परिपत्रकात म्हटले आहे. रात्री एकट्याने प्रवास करणाऱ्या महिलांना मिळणार गस्त घालणाऱ्या अधिकाऱ्यांकडून मदत; आयुक्त Hemant Nagrale यांची माहिती
मुंबईतील प्रत्येक पोलीस ठाण्यात एक निर्भया पथक किंवा विशेष महिला सुरक्षा कक्ष असणार आहे. यात एक महिला सहाय्यक निरीक्षक किंवा उपनिरीक्षक, एक महिला हवालदार, एक पुरुष हवालदार आणि ड्रायव्हर यांचा समावेश असेल, असे आयुक्तांनी म्हटले आहे. मुंबईत महिलांवरील अत्याचाराच्या वाढत्या घटना लक्षात घेता मुंबई पोलीस आयुक्त हेमंत नगराळे यांनी मुंबई पोलिसांना अतिदक्षतेच्या सूचना दिल्या आहे. त्या सूचना खालीलप्रमाणे आहेत-
- महिलांसंदर्भात कॉलकडे दुर्लक्ष करू नये व त्याची तात्काळ योग्य ती निर्गती करावी. नियंत्रण कक्ष प्रभारी अधिकारी यांनी यावर सतत लक्ष ठेवावे.
- मुंबई पोलीस ठाण्याच्या हद्दीतील अंधाराची ठिकाणे, निर्जन स्थळाचा आढावा घेण्यात यावा. तसेच या परिसराता मोबाईल वाहनांची गस्त वाढवावी.
- अंधाराच्या ठिकाणी आणि निर्जन स्थळी लाईची व्यवस्था करण्यात यावी, याकरीता महापालिकेशी पत्रव्यवहार करून पाठपुरावा करावा. याचबरोबर सी.सी.टी.व्ही बसविण्याकरीता संबंधीताकडे प्रस्ताव सादर करून याबाबत पाठपुरावा करावा. एवढेच नव्हेतर, या ठिकाणी क्यू आर कोड लावण्यात यावे. ज्यामुळे अनुचित प्रकार टाळता येऊ शकतात.
- पोलीस ठाण्याच्या हद्दीत असलेली सार्वजनिक प्रसाधनगृहे परिसरात महानगरपालिकेमार्फत पुरेशी लाईट व्यवस्था करून घ्यावी आणि मोबाईल 5 वाहनांची गस्त ठेवावी. यावेळी संशयित व्यक्ती आढळल्यास पोलिसांनी त्याची चौकशी करावी. आवश्यक असल्यास कारवाई देखील करावी.
- एखादी महिला रात्रीच्या वेळी एकटी आढळून आल्यास पोलिसांनी तिची विचारपूस करावी. तसेच त्या महिलेला योग्य ती मदत करावी. गरज भासल्यास सदर महिलेस सुरक्षिततेच्या दृष्टीने सुरक्षित ठिकाणी व्यवस्था करावी.
- पोलीस ठाण्याच्या हद्दीत अंमली पदार्थाचे सेवन करणारा व्यक्ती आढळल्यास तसेच अंमली पदार्थ बाळगणाऱ्यांवर योग्य ती प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात यावी.
- पोलीस ठाण्याच्या हद्दीत रस्त्यावर अनेक दिवसांपासून उभे असलेली वाहनांच्या (टेम्पो, टॅक्सी, टूक यासांरखे इतर वाहने) मालकाचा शोध घेऊन ती वाहने तिथून काढायला सांगणे. अन्यथा अशी वाहने ताब्यात घेऊन पुढील करावी.
- महिलांसंबंधीत गुन्ह्यात कलम 354, 363, 376, 509 भादवि व पोस्को कायद्याअंतर्गत अटक आरोपींचा स्वतंत्र अभिलेख तयार करण्यात यावा. याप्रकरणातील सर्व आरोपींवर योग्य ती प्रतिबंधक कारवाई करण्यात यावी.
- पोलीस ठाण्याच्या हद्दीत असणाऱ्या रेल्वे स्थानकावर लांब पल्याच्या गाड्या थांबतात, अशा सर्व रेल्वे स्थानकाच्या बाहेर पोलीस बंदोबस्त असावा. तसेच या ठिकाणी मोबाईल वाहन रात्री 10 वाजल्यापासून तर, सकाळी 7 वाजेपर्यंत तैनात करण्यात यावी. दरम्यान, रात्री गस्तीवरील अधिकार्यांनी रेल्वे स्थानका बाहेर भेटी द्यावेत व तेथे कोणताही अनुचित प्रकार घडणार नाही याची दक्षता घ्यावी.
- मोबाईल वरील कर्तव्यावर असणाऱ्या अधिकारी व अंमलदार यांनी एकट्या येणाऱ्या महिलांची विचारपूस करावी. तसेच अशा महिलांना इच्छित स्थळी पोहचवण्यासाठी वाहन उपलब्ध करून द्यावे. याचबरोबर त्या वाहनांचा क्रमांक आणि वाहनचालकाचा मोबाईल क्रमांक नोंद करून घ्यावी. त्यानंतर संबंधित महिला सुरक्षितपणे पोहचली, याची खात्री करून घ्यावी.
मुंबईत गेल्या काही दिवसांपासून महिला अत्याचार आणि विनयभंगाच्या सतत घडत आहेत. मात्र, मुंबई पोलिसांच्या निर्भया पथकामुळे अशा प्रकारच्या गुन्हेगारीत घट होण्याची शक्यता आहे.