Heat wave. Representational Image. (Photo Credits: Pixabay)

एकीकडे देशात कोरोना विषाणूचा धोका वाढत असताना, दुसरीकडे यंदाची उष्णताही (Heat) जीवघेणी ठरू शकते. संशोधकांच्या मते, यावर्षी भयंकर उष्णता (High Temperature) असेल आणि मुख्यत्वे दक्षिण आशियाई देशांमध्ये तापमान वाढीचा उद्रेक होईल. सध्या मुंबईमध्ये (Mumbai) मार्च महिन्यातच याचा अनुभव यायला सुरुवात झाली आहे. मुंबईमध्ये मागच्या काही दिवसांत दिवसात कमाल तापमान सरासरी पेक्षा 5,6 अंश जास्त राहीले. शहरात आजही अशीच स्थिती आहे. के.एस. होसाळीकर यांनी याबाबतची माहिती देताना म्हटले आहे, आज 27 मार्च रोजी, सांताक्रूझ वेधशाळेमध्ये दुपारी अडीच वाजता 40.6 डिग्री सेल्सियस तापमानाची नोंद झाली.

महत्वाचे म्हणजे, होसाळीकर यांच्या मते कदाचित हे सर्वोच्च तापमान असू शकत नाही, यापेक्षाही जास्त तापमानाचा सामना करावा लागू शकतो. पुढच्या काही तासांत तापमानात आणखी वाढ होणार असल्याचा इशाराही त्यांनी दिला. आज दुपारनंतर मुंबई सांताक्रूझ वेधशाळेमध्ये 40.9 डिग्री सेल्सियस तापमानाची नोंद झाली आहे. कुलाबा वेधशाळेमध्ये आज 38 डिग्री सेल्सियस तापमानाची नोंद झाली.

होसाळीकर यांनी हे देखील सांगितले की, मार्चमधील सर्वाधिक तापमान हे 28 मार्च 1956 रोजी नोंदवण्यात आले होते, ते 41.7 डिग्री सेल्सियस होते. हवामान खात्याच्या म्हणण्यानुसार, गरम व कोरड्या उत्तर पश्चिम वाऱ्यामुळे मुंबईत उष्णता वाढत आहे. हवामान खात्याच्या शास्त्रज्ञ शुभांगी भुते यांच्यामते 15 फेब्रुवारीपासून मुंबईत हवामान बदलण्यास सुरवात होते. (हेही वाचा: महाराष्ट्रासह 'या' 6 राज्यात कोरोना विषाणूच्या 80 टक्के प्रकरणांची नोंद; जाणून घ्या देशातील स्थिती)

दक्षिणपूर्व पाकिस्तान आणि लगतच्या कच्छ भागात चक्रीवादळाचे वादळ कायम आहे. या चक्रीवादळामुळे वा वाऱ्याची दिशा उत्तर पूर्व ते मध्य ट्रोफॉस्फेरिक पातळीपर्यंत आहे. जेव्हा जमिनीवरील तापमान वाढते तेव्हा हवा वाढते. मुंबईसह कोकण व पश्चिम महाराष्ट्रात पुढील काही दिवस तापमान वाढीचा इशारा दिला आहे. त्यामुळे नागरिकांनी काळजी घ्यावी असे आवाहन केले गेले आहे.