Mumbai Rains Updates: मुंबई, ठाणे, पालघर सह कोकणात आजही मुसळधार पावसाची शक्यता; हवामान विभागाचा अंदाज
Rains | File image | (Photo Credits: PTI)

आज (5 ऑगस्ट) सकाळपासूनच मुंबई (Mumbai), ठाणे (Thane), नवी मुंबई (Navi Mumbai) येथे दमदार पावसाने हजेरी लावली. गेल्या दोन दिवसांपासून पडत असलेल्या पावसाने मुंबईकरांचे जनजीवन विस्कळीत केले होते. आजही पावसाचा जोर कायम राहणार असून मुंबईत रेड अलर्ट (Red Alert) जारी करण्यात आला आहे. गेल्या 12 तासांत मुंबई, ठाणे, नवी मुंबई मध्ये मुसळधार पाऊस झाला. तर मुंबईच्या पश्चिम उपनगरांत सुमारे 150mm हून अधिक पावसाची नोंद झाली.

आज मुंबई, ठाणे, पालघर यांसह पश्चिम किनारपट्टीवर मुसळधार पावसाचा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे. पुढील 24 तासांत कोकणात मुसळधार पाऊस होईल असा अंदाज आहे. दरम्यान डहाणू येथे आज सकाळी 364mm इतक्या पावसाची नोंद झाली. अशी माहिती मुंबई हवामान विभागाचे उपमहासंचालक (Dy Director General of Meteorology) के.एस.होसाळीकर (K S Hosalikar) यांनी ट्विटच्या माध्यमातून दिली आहे.

K S Hosalikar Tweet:

दरम्यान आज सकाळपासूनच सुरु झालेल्या मुसळधार पावसामुळे मुंबईच्या सखल भागात पाणी साचायला सुरुवात झाली आहे. काल मुंबई आणि उपनगरांतील शासकीय कार्यालयांना अतिवृष्टीमुळे सुट्टी जाहीर करण्यात आली होती. तसंच नागरिकांनी विनाकारण घराबाहेर पडू नये असे आवाहनही करण्यात आलं होतं.