Mumbai Cyber Police: बायकोपुढे शायनिंग मारण्यासाठी मुंबई पोलिसांची पासपोर्ट पडताळणी यंत्रणा हॅक, उचापतखोर नवऱ्यास अटक
Cybercrime | (Photo Credits: Archived, edited)

Mumbai Police Passport Verification: तंत्रज्ञानात प्रविण असलेल्या एका अभियंत्याला बायकोसमोर शायनिंग (To Impress Wife) मारण्यासाठी अक्कल पाजळणे चांगले महागात पडले. या पठ्ठ्याने केवळ बायकोला खूश करण्यासाठी तंत्रज्ञानाचा वापर करत चक्क मुंबई पोलिसांच्या (Mumbai Police) पासपोर्ट पडताळणी (Passport Verification) शाखेची यंत्रणा हॅक केली. मुंबई गुन्हे शाखेच्या सायबर पोलिसांनी (Mumbai Cyber Police) 27 वर्षीय सिव्हिल इंजिनिअरला या प्रकरणात नुकतीच अटक केली. राजा बाबू शाह असे आरोपीचे नाव आहे. त्याच्यावर पासपोर्ट पडताळणी यंत्रणा हॅक करुन पत्नी आणि अन्य तिघांचे अर्ज मंजूर केल्याचा आरोप आहे. पोलिसांनी अभियंत्याकडे केलेल्या चौकशीत पुढे आले की, त्याला आपल्या पत्नीला खूश करायचे होते. तिला प्रभावित करण्याच्या उद्देशाने त्याने हे कृत्य केले.

राजा बाबू शाह याने पोलिसांकडे गुन्ह्याची कबुली देताना सांगितले की, आपण मुंबई पोलिसांच्या पासपोर्ट विभागाची यंत्रणा हॅक केली. त्यानंतर आपण पत्नीचा पासपोर्ट अर्ज मंजूर केला. या प्रकाराचा कोणालाही संशय येऊ नये यासाठी आपण अन्य दोघांचे अर्जही मंजूर केल्याची माहिती त्याने पोलिसांना दिली. आरोपीच्या पत्नीने सादर केलेली कागदपत्रे बरोबर असून त्यात कोणतीही आक्षेपार्ह बाब नव्हती. मात्र, आता आरोपी आणि त्याच्या पत्नीविरोधात एफआयआर दाखल झाल्याने पासपोर्ट बंद करण्यात आला आहे. आरोपी सध्या न्यायालयीन कोठडीत आहे. टाईम्स ऑफ इंडियाने याबाब तवृत्त दिले आहे. (हेही वाचा, Cyber Attack Via Email: सर्वेक्षणात सहभागी झालेल्या कंपन्यांवर सायबर गुन्हेगारांकडून ईमेल हल्ला; 82% संस्था सरासरी एकदा तरी ठरल्या पीडित)

मुंबई सायबर पोलिसांनी मागील वर्षी (2022) आझाद मैदान पोलिस ठाण्यात अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल केला होता. आयपीसी आणि माहिती तंत्रज्ञान कायद्याच्या विविध कलमांतर्गत सुरक्षेचा भंग, फसवणूक या आरोपांखाली गुन्हा दाखल केल्यावर पोलिस आरोपीचा शोध घेत होते. दरम्यान, आरोपीने आपल्या पत्नीसह चेंबूर, टिळक नगर आणि एन्टॉप हिल येथे राहणाऱ्या तीन महिलांचे पासपोर्ट काढले. पोलीस तपासात असेही पुढे आले की, आरोपीने वापरलेला इंटरनेट प्रोटोकॉल पत्ता (Internet Protocol address) म्हणजेच आयपी अॅड्रेस हा नोएडा येथील एका उपकरणाशी संलग्न करण्यात आला होता. दरम्यान, ही घटना 24 सप्टेंबर रोजी घडली असून सार्वजनिक सुट्टीचा दिवस असल्याने पोलिसांची पासपोर्ट शाखा त्या दिवशी बंद होती, असे आझाद मैदान पोलिांनी सांगितले.

मुंबई पोलिसांनी सदर प्रकरणाचा संपूर्ण तापास गुन्हे शाखेच्या सायबर पोलिस स्टेशनकडे (दक्षिण) वर्ग केला होता. थेट मुंबई पोलिसांच्या यंत्रणेवरच सायबर हल्ला झाल्याने पोलीसही सतर्क होते. आरोपीचा कसून शोध घेत होते. दरम्यान, डीसीपी बलसिंग राजपूत यांच्या नेतृत्वाखाली एसीपी रामचंद्र लोटलीकर, पीआय किरण जाधव आणि पीएसआय प्रकाश गवळी यांच्या पथकाने तांत्रिक गुप्तचरांच्या मदतीने आरोपी राजा बाबू शाह याला उत्तर प्रदेशातील गाझियाबाद येथून अटक केली. तो उत्तर प्रदेशमध्ये भाड्याच्या घरात राहत होता.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपीची पत्नी मुंबईत काम करते. त्याने पासपोर्टसाठी अर्ज केला. आरोपीने बेकायदेशीरपणे सिस्टीममध्ये प्रवेश मिळवला आणि त्याच्या पत्नीसह 3 जणांचे अर्ज मंजूर केले. पोलीस तपास करत आहेत. आरोपीने गुन्हा कबूल केला आहे. मात्र, त्याने पोलिसांची पासपोर्ट यंत्रणा हॅक कशी केली. ती करण्यासाठी संगणकीय तांत्रिक प्रणालीमध्ये त्याने प्रवेश कसा केला हे सांगण्यास नकार दिला आहे. प्रादेशिक पासपोर्ट कार्यालयाकडून पासपोर्टची फाईल त्या शहरातील विशेष शाखेकडे पाठवली जाते. विशेष शाखेकडून अर्जदाराचा अहवाल स्थानिक पोलिसांकडून मागवला जातो आणि त्यानंतर पासपोर्ट जारी करायचा की नाही याबाबत निर्णय घेतला जातो. पोलिस विभागाकडून ग्रीन सिग्नल मिळाल्यानंतरच पासपोर्ट कार्यालय अर्जदाराला पासपोर्ट पाठवते.