मुंबईतील प्रसिद्ध कुरिअर आणि लॉजिस्टिक्स सेवा विचारे कुरिअर्सच्या (Vichare Couriers) मालकावर चारकोप पोलिसांनी (Mumbai Police) गुन्हा दाखल केला आहे. विचारे एक्स्प्रेस आणि लॉजिस्टिक प्रायव्हेट लिमिटेडचे संस्थापक आणि संचालकांवर कर्मचाऱ्यांच्या पगारातून निधी कापून भविष्य निर्वाह निधी (Provident Fund Fraud) कार्यालयात जमा न केल्याचा आरोप आहे. चारकोप पोलिसांनी या प्रकरणाचा तपास सुरू केला आहे. हे प्रकरण थोडेथोडके नव्हे तर, तब्बल 4.71 कोटी रुपयांच्या कथित भविष्य निर्वाह निधी फसवणुकीशी संबंधीत आहे.
विचारे कुरिअर्सवर आरोप: मुंबईतील प्रमुख कुरिअर आणि लॉजिस्टिक सेवा प्रदाता विचारे कुरिअर्सच्या मालकावर एकूण 4.71 कोटी रुपयांचा भविष्य निर्वाह निधी घोटाळा केल्याचा आरोप आहे. तीन आरोपी संस्थापक आणि संचालकांनी भविष्य निर्वाह निधी कार्यालयात जमा न करता कर्मचाऱ्यांच्या पगारातून निधी कपात केल्याचा आरोप आहे. (हेही वाचा, PPF मध्ये पैसा गुंतवून करोडपती होण्याची संधी; पाहा काय आहे फंडा)
प्रॉव्हिडंट फंड विभागाकडून तक्रार: भविष्य निर्वाह निधी निरीक्षक स्नेहा कुलकर्णी यांनी आरोपी महेंद्र विनायक विचारे, चंद्रकांत वसंत विचारे आणि अविनाश शिर्के यांचेविरुद्ध पोलिस तक्रार दाखल केली आहे. आरोपींनी कपात केलेला निधी चुकीच्या कामासाठी वळवला, कर्मचारी आणि भविष्य निर्वाह निधी कार्यालय दोघांचीही फसवणूक केल्याचा आरोप तक्रारीत करण्यात आला आहे. (हेही वाचा, SBI मध्ये PPF खाते सुरु करुन मिळवा भरघोस व्याज, जाणून घ्या ऑनलाईन प्रक्रिया)
कंपनीची पार्श्वभूमी: डिसेंबर 1996 मध्ये स्थापन झालेली विचारे एक्सप्रेस आणि लॉजिस्टिक प्रायव्हेट लिमिटेड 43 हून अधिक सेवा केंद्रांसह कार्यरत आहे आणि तिच्या वेबसाइटनुसार 600 हून अधिक लोकांना रोजगार देते. कंपनीचे नोंदणीकृत कार्यालय चारकोप, कांदिवली (पश्चिम) येथे आहे.
फसवणुकीचा घटनाक्रम: भविष्य निर्वाह निधी निरीक्षक स्नेहा कुलकर्णी यांच्या माहितीनुसार, आरोपी संस्थापक आणि संचालकांनी नोव्हेंबर 2020 ते 2022 दरम्यान कर्मचाऱ्यांची फसवणूक केली. कंपनी व्यवस्थापनाने कर्मचार्यांच्या पगारातून पीएफसाठी 4.71 कोटी रुपये कापले परंतु ते पैसे भविष्य निर्वाह निधी कार्यालयात जमाच केले गेले नाहीत.
आरोप आणि एफआयआर: चारकोप पोलिसांनी महेंद्र विचारे, चंद्रकांत विचारे आणि अविनाश शिर्के यांच्याविरुद्ध भारतीय दंड संहितेच्या कलम 406 (फसवणूक करणे), 420 (फसवणूक) आणि 34 (सामान्य हेतू) अन्वये गुन्हा दाखल केला आहे. पीएफ कार्यालयाच्या चौकशीदरम्यान अनियमितता उघडकीस आल्यानंतर हे प्रकरण सुरू करण्यात आले.
दरम्यान, प्रकरणाचा तपास सुरु असून या प्रकरणात अद्याप कोणालाही अटक करण्यात आलेली नाही. संबंधित दस्तऐवजांचे विश्लेषण करणे हा एक तपासाचा महत्त्वाचा भाग असल्याचे पलिसांनी म्हटले आहे.