Mumbai New Ring Roads: लवकरच मुंबईकर (Mumbai) अवघ्या एका तासात संपूर्ण शहराचा प्रवास करू शकणार आहेत. मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण (MMRDA) ने शहरासाठी 90.18 किमी अतिरिक्त रस्ते बांधण्याची योजना आखली आहे. एमएमआरडीएने संपूर्ण शहरात सात रिंगरोड (New Ring Roads) प्रस्तावित केले आहेत. नियोजित प्रस्तावासाठी सुमारे 58,517 कोटी रुपये खर्च येईल, असे इंडियन एक्सप्रेसच्या अहवालात म्हटले आहे. या योजनेमुळे जास्तीत जास्त शहरातील प्रवासाचा वेळ एक तासापर्यंत कमी होईल. या योजनेत मेट्रो, पूल, उड्डाणपूल आणि झोपडपट्टी विकास यासारख्या पायाभूत सुविधा प्रकल्पांचा समावेश असेल. म्हणजेच हे रस्ते विद्यमान आणि आगामी मेट्रो यंत्रणा, पूल आणि उड्डाणपूल यांना जोडतील, ज्यामुळे मुंबईतील प्रवास जलद आणि सुलभ होईल.
शहरातील नवीन रस्ते बांधणी, झोपडपट्टी पुनर्विकास प्रकल्प, सार्वजनिक वाहतूक सुधारणा यासह अन्य कामांवर खर्च झाल्यानंतर या प्रकल्पासाठी सुमारे तीन लाख कोटी रुपये खर्च येणार आहे. सर्व काही सुरळीत राहिल्यास 2029 पर्यंत मुंबईकरांना शहरातील रोजच्या वाहतूककोंडीच्या समस्येपासून दिलासा मिळेल. एमएमआरडीए पुढील 5 वर्षांत शहराचा चेहरामोहरा देण्यासाठी या 7 रिंगरोड प्रकल्पांसाठी एक मास्टर प्लॅन तयार केला आहे. ही योजना मुंबई महानगर प्रदेश (MMR) मध्ये पसरलेल्या रस्ते, पूल, बोगदे आणि उड्डाणपुलांच्या जाळ्याद्वारे शहराच्या कनेक्टिव्हिटीला आकार देईल.
या रिंगरोड्सचा उद्देश पूर्व-पश्चिम कनेक्टिव्हिटीला चालना देण्याचा आहे, ज्यामुळे शहरातील उत्पादकता आणखी सुधारेल. अहवालानुसार, मुंबईच्या उत्तरेकडील वडोदराजवळील गुजरात सीमेपासून दक्षिणेकडील अलिबागपर्यंत पसरलेल्या या विशाल प्रकल्पाचे उद्दिष्ट 2029 पर्यंत शहर ट्राफिकमुक्त करण्याचे आहे.
असे आहेत सात रिंग रोड्स-
मास्टर प्लॅननुसार, पहिला रिंग रोड मुंबई कोस्टल रोडवरील नरिमन पॉइंटपासून सुरू होईल आणि वांद्रे-वरळी सी लिंक, शिवडी-वरळी कनेक्टर आणि ऑरेंज गेट बोगद्याद्वारे नरिमन पॉइंटला जोडला जाईल. त्यामुळे दक्षिण मुंबईचा प्रवास सुरळीत होईल.
दुसरा रिंग रोड नरिमन पॉइंटपासून सुरू होऊन वांद्रे-वरळी सी लिंक, वेस्टर्न एक्स्प्रेस हायवे, सांताक्रूझ, चेंबूर आणि इस्टर्न फ्रीवे जंक्शनला जोडून कोस्टल रोडवरील नरिमन पॉइंटला जोडला जाईल. (हेही वाचा: Solapur Airport: येत्या 26 सप्टेंबर रोजी PM Narendra Modi यांच्या हस्ते होणार सोलापूर विमानतळाचे उद्घाटन; लवकरच सुरु होणार पुणे, मुंबईसाठी विमान सेवा)
तिसरा रिंग रोड नरिमन पॉइंटला वांद्रे-वरळी सी लिंक आणि जोगेश्वरी-विक्रोळी लिंक रोड (JVLR) ला जोडतो, जो पवई-कांजूरमार्ग जंक्शन, ईस्टर्न फ्रीवे मार्गे ऑरेंज गेट बोगद्याकडे जाईल.
चौथा रिंग रोड नरिमन पॉइंट-वांद्रे वरळी सी लिंक-वर्सोवा वांद्रे सी लिंक-वर्सोवा दहिसर लिंक रोड-गोरेगाव मुलुंड लिंक रोड-इस्टर्न फ्रीवे एक्स्टेंशन-ईस्टर्न फ्रीवे-ऑरेंज गेट टनेल-नरीमन पॉइंट.
पाचवा रिंग रोड, नरिमन पॉइंट-वांद्रे वरळी सी लिंक-वर्सोवा दहिसर लिंक रोड-भाईंदर-फाउंटन हॉटेल कनेक्टर-गायमुख-घोडबंदर बोगदा-ठाणे कोस्टल रोड-आनंद नगर-साकेत फ्लायओव्हर-इस्टर्न फ्रीवे विस्तार-ऑरेंज गेट टनेल-नरीमन पॉइंट, असा असेल.
सहावा रिंगरोड मुंबईला बहु-मोडल अलिबाग-विरार कॉरिडॉरशी जोडेल, ज्यामुळे अलिबाग, ठाणे आणि विरार दरम्यानचा प्रवास अधिक सुलभ होईल. अलिबाग-विरार कॉरिडॉर 100 किलोमीटरचा असणार असून त्यासाठी जमीन संपादित केली जात आहे.
याव्यतिरिक्त, 7 वा रिंगरोड नरिमन पॉईंटपासून सुरू होईल आणि वर्सोवा-भाईंदर लिंक रोड, वडोदरा-मुंबई द्रुतगती मार्ग, जेएनपीटी पोर्ट रोड, अटल सेतू आणि ऑरेंज गेट बोगदा मार्गे नरिमन पॉइंटवर परत येईल. हा मुंबईचा सर्वात विस्तृत रिंग रोड मानला जातो.
एमएमआरडीएचे आयुक्त संजय मुखर्जी यांनी इंडियन एक्स्प्रेसला सांगितले की, रिंगरोड प्रकल्पाचा उद्देश संपूर्ण शहरात प्रवासाचा वेळ एका तासापेक्षा कमी करणे आहे. एमएमआरडीए, बीएमसी आणि एमएसआरडीसी यांच्या सहकार्याने, वेगवान गतिशीलता, उत्तम कनेक्टिव्हिटी आणि सुरळीत मालवाहतुकीसह मुंबईच्या वाहतुकीचे भविष्य आशादायक दिसत आहे.