मुंबई ते नागपूर दरम्यान तयार होणाऱ्या मुंबई-नागपूर बुलेट ट्रेनचा (Mumbai-Nagpur Bullet Train) सविस्तर प्रकल्प अहवाल (DPR) तयार असून नॅशनल हाय स्पीड रेल कॉर्पोरेशन लिमिटेड (NHSRCL) ने हा DPR रेल्वे बोर्डाला सादर केला आहे. हा बुलेट ट्रेन कॉरिडॉर सुमारे 766 किमी लांबीचा असेल. महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळ बांधत असलेल्या मुंबई-नागपूर समृद्धी महामार्गालगत ते बांधण्यात येणार आहे. बुलेट ट्रेनचा हा मार्ग वर्धा, खापरी डेपो, पुलगाव, मालेगाव जहांगीर, जालना, कारंजा लाड, मेहकर, शिर्डी, नाशिक, औरंगाबाद, इगतपुरी आणि शहापूरमधून जाणार आहे. अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, मुंबई-नागपूरचा हा डीपीआर फेब्रुवारीच्या मध्यात तयार करण्यात आला होता. 28 फेब्रुवारी रोजी ते भारतीय रेल्वे बोर्डाकडे सुपूर्द करण्यात आले. आता पुढील निर्देशांची प्रतीक्षा आहे. डीपीआरनुसार ही बुलेट ट्रेन 10 जिल्ह्यांतून जाणार आहे.
ते तयार झाल्यानंतर दोन्ही शहरांमधील प्रवासासाठी लागणारा वेळ खूपच कमी होईल. एका अधिकाऱ्याने सांगितले की, सध्या मुंबईहून नागपूरला पोहोचण्यासाठी 12 तासांचा अवधी लागत असला तरी बुलेट ट्रेनने हे अंतर 4 तासांत कापले जाऊ शकते.
मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेन कॉरिडॉरची तयारी
मुंबई-नागपूर व्यतिरिक्त नॅशनल हायस्पीड रेल कॉर्पोरेशन लिमिटेड मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेन कॉरिडॉरची तयारी करत आहे. देशातील पहिली बुलेट ट्रेन येथे धावणार आहे. याशिवाय महाराष्ट्र रेल इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन लिमिटेड मुंबई ते पुणे दरम्यान सेमी हायस्पीड ट्रेन चालवण्याची योजनाही तयार करत आहे. त्याचा व्यवहार्यता अभ्यास करण्याचे काम सुरू झाले आहे. हा भारतीय रेल्वे आणि महाराष्ट्र सरकारचा संयुक्त उपक्रम आहे. (हे ही वाचा Punjab Assembly Elections 2022 Results: Bhagwant Mann यांनी घेतली राज्यपालांची भेट; 16 मार्चला घेणार पंजाबच्या मुख्यमंत्री पदाची शपथ)
मुंबई नागपुर बुलेट ट्रेन 350 किमी वेगाने धावेल
यापूर्वी, केंद्रीय रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी 11 फेब्रुवारी रोजी संसदेत दाखल केलेल्या लेखी उत्तरात मुंबई-नागपूर 766 किलोमीटर लांबीच्या मार्गावर बुलेट ट्रेन ताशी 350 किमी वेगाने धावतील असे सांगितले होते. या बुलेट ट्रेनचे भाडे किती असेल, हे अद्याप ठरलेले नसले तरी एका अंदाजानुसार ते रेल्वेच्या फर्स्ट एसी क्लासचे भाडे दीडपट असू शकते. या प्रकल्पासाठी एक लाख कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे.