Punjab Assembly Elections 2022 Results: Bhagwant Mann यांनी घेतली राज्यपालांची भेट; 16 मार्चला घेणार पंजाबच्या मुख्यमंत्री पदाची शपथ
Bhagwant Mann (PC - Facebook)

Punjab Assembly Elections 2022 Results: पंजाब विधानसभा निवडणुकीत आम आदमी पक्षाच्या दणदणीत विजयानंतर भगवंत मान (Bhagwant Mann) यांनी आज राज्यपाल बनवारीलाल पुरोहित यांची भेट घेतली. मान यांनी राज्यात पुढील सरकार स्थापन करण्याचा दावा केला. राज्यपालांनी त्यांचा दावा मान्य केला आहे. राज्यपालांनी त्यांना पुढील सरकार स्थापन करण्यासाठी आमंत्रित केले आहे. 16 मार्च रोजी सकाळी 12.30 वाजता खटकड़ कला येथे भगवंत मान यांचा मुख्यमंत्रिपदाचा शपथविधी सोहळा होणार आहे.

भगवंत मान यांनी सांगितलं की, या कार्यक्रमासाठी पंजाबमधील सर्व लोकांना आमंत्रित केले आहे. या निमित्ताने प्रत्येक पंजाबीला शपथ घ्यायची आहे. सर्व काही पंजाबच्या प्रगतीसाठी असेल. मान पंजाबी भाषेत शपथ घेणार आहेत. शपथविधी सोहळ्याला आपचे राष्ट्रीय संयोजक अरविंद केजरीवाल यांच्यासह अनेक नेते उपस्थित राहणार आहेत. (वाचा - निवडणुकीतील विजयानंतर Narendra Modi पोहोचले आई Hiraben Modi यांच्या भेटीला; एकत्र जेवणही घेतले (See Photo))

भगवंत मान यांनी सकाळी पंजाबचे राज्यपाल बनवारीलाल पुरोहित यांची भेट घेतली. त्यांनी पंजाबमध्ये पुढील सरकार स्थापन करण्यासाठी आम आदमी पक्षाच्या आमदारांच्या यादीसह त्यांना दावा पत्र सादर केले. आम आदमी पार्टीचे प्रमुख आणि पंजाबचे पुढील मुख्यमंत्री भगवंत मान म्हणाले की, आम्ही एक चांगले मंत्रिमंडळ बनवू आणि त्यात ऐतिहासिक निर्णय होतील. हे जनतेचे सरकार असेल आणि जनतेतूनचं चालेल.

आम आदमी पक्षाचे सरकार पंजाबमधील जनतेचे सरकार असेल आणि राज्याला नव्या दिशेने नेण्यासाठी आम्ही सर्वतोपरी प्रयत्न करू. पंजाबच्या जनतेला दिलेली आश्वासने आम्ही पूर्ण करू आणि जनतेची सेवा करणे हेच आमचे ध्येय असेल, असे मान यांनी यावेळी स्पष्ट केले. पंजाब विधानसभा निवडणुकीत आम आदमी पक्षाने दणदणीत विजय नोंदवला आणि 92 जागा मिळवल्या. दुसऱ्या क्रमांकावर आलेल्या काँग्रेसला 18 जागा मिळाल्या.