Maharashtra Legislature | (File Photo)

विधानसपरिषदेच्या रिक्त सहा जागांसाठी होणारी निवडणूक (Maharashtra MLC By-election) बिनविरोध करण्यासाठी सत्ताधारी महाविकासआघडी आणि विरोधी पक्षातील भाजप अशा दोन्ही बाजूंनी प्रयत्न सुरु आहेत. या प्रयत्नांना पहिले यश मुंबई येथून मिळाले आहे. काँग्रेसच्या पाठिंब्यावर अपक्ष उमेदवारी दाखल केलेल्या सुरेश कोपरकर यांनी आपला अर्ज मागे घेतला आहे. त्यामुळे शिवसेना (Shiv Sena) उमेवदवार सुनिल शिंदे (Sunil Shinde) आणि भाजप (BJP) उमेदवार राजहंस सिंह (Rajhans Singh) यांचा विधानपरिषदेवर बिनविरोध जाण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.

सुरेश कोपरकर यांनी उमेदवारी अर्ज मागे घेतला नसता तर मुंबई येथून होणारी निवडणूक तिरंगी झाली असती. त्यामुळे शिवसेनेच्या सुनिल शिंदे यांच्या बाबतीत काही दगाफटका होणार का? अशी चर्चा राजकीय वर्तुळात होती. मात्र, कोपरकर यांनी अर्ज मागे घेतल्याने या चर्चेला पुर्णविराम मिळाला आहे. (हेही वाचा, Maharashtra MLC By-election: प्रज्ञा सातव यांच्या बिनविरोध निवडीचा मार्ग मोकळा, भाजपची उमेदवारी मागे)

शिवसेनेकडून उमेदवारी देण्यात आलेले सुनिल शिंदे हे कट्टर शिवसैनिक म्हणून ओळखले जातात. ते अनेक वर्षे नगरसेवक होते. त्यांनी बेस्ट समितीचे अध्यक्षही होते. त्यांच्या उमेदवारीने मुंबई महापलिका निवडणुकीत शिवसेनेची ताकद आणखी वाढेल असे सांगण्यात येत आहे.

दुसऱ्या बाजूला भाजपने राजहंस सिंह यांना उमेदवारी दिली आहे. राजहंस हे मुळचे काँग्रेसचे. त्यांनी मधल्या काळात भाजपमध्ये प्रवेश केला. नगरसेवक ते आमदार असा त्यांचा राजकीय प्रवास आहे. विधानसभा निवडणुकीत भाजप तिकिटावर त्यांचा पराभव झाला होता. तेव्हापासून ते विजनवासात गेले होते. आता भाजपने पुन्हा त्यांना संधी दिली आहे. मुबई महापालिका निवडणुकीत उत्तर भारतीय मते मिळविण्यासाठी भाजपने ही खेळी केल्याची चर्चा आहे.