Pradnya Satav (Photo Credits-Facebook)

दिवंगत काँग्रेस नेते राजीव सातव (Rajiv Satav) याच्या पत्नी डॉ. प्रज्ञा सातव (DR. Pradnya Satav) यांचा विधानपरिषदेवर बिनविरोध जाण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. भारतीय जनता पक्षाने त्यांच्या विरोधात उमेदवार न उतरवण्याची घोषणा केली आहे. आमदार शरद रणपिसे यांच्या निधनानंतर रिक्त झालेल्या विधानपरिषदेच्या जागेसाठी काँग्रेसकडून प्रज्ञा सातव यांना उमेदवारी देण्यात आली आहे. काँग्रेसने (Congress) सातव यांना उमेदवारी दिल्यामुळे भाजप (BJP) आपला उमेदवारी अर्ज मागे घेत असल्याची घोषणा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांनी केली आहे.

कोल्हापूर येथून विधान परिषदेसाठी भाजपने अमल महाडिक यांचा उमेवारी अर्ज दाखल केला. या वेळी चंद्रकांत पाटील यांच्यासह भाजपचे अनेक पदाधिकारी आणि उपस्थित होते. महाडिक यांचा उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर चंद्रकांत पाटील प्रसारमाध्यमांशी बोलत होते. या वेळी त्यांनी प्रज्ञा सातव यांच्या विरोधात भाजप आपला उमेदवार देणार नसल्याचे सांगितले. (हेही वाचा, Rajya Sabha Bypolls 2021: काँग्रेसच्या रजनी पाटील यांच्या उमेदवारीबद्दल चंद्रकांत पाटील यांचे मोठे विधान, सांगीतली भाजप मतांची जुळवाजुळव)

राजीव सातव यांच्या पत्नी प्रज्ञा सातव यांना राज्यसभेवर संधी मिळावी. त्यासाठी त्यांना राज्यसभेची उमेदवारी मिळावी असा आमचा आग्रह होता. मात्र, आता काँग्रेसने त्यांना विधानपरिषदेची उमेदवारी दिली आहे. सातव यांच्याच घरात उमेदवारी दिली गेल्याने आम्ही आमचा उमेदवारी अर्ज मागे घेत असल्याचे चंद्रकांत पाटील यांनी या वेळी सांगितले. दरम्यान, प्रज्ञा सातव यांची विधान परिषदेवर बिनविरोध निवड व्हावी यासाठी काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात व नाना पटोले यांनी देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली होती, अशी माहितीही चंद्रकांत पाटील यांनी वेळी दिली. बाळासाहेब थोरात, नाना पटोले यांनी देवेंद्र फडणवीस यांची घेतलेली भेट कामी आली अशी चर्चा चंद्रकांत पाटील यांच्या घोषणेनंतर सुरु झाली आहे.