Rajya Sabha Bypolls 2021: काँग्रेसच्या रजनी पाटील यांच्या उमेदवारीबद्दल चंद्रकांत पाटील यांचे मोठे विधान, सांगीतली भाजप मतांची जुळवाजुळव
Chandrakant Patil | (Photo Credit: Twitter)

राज्यसभा निवडणूक 2021 (Rajya Sabha Bypolls 2021) मधील काँग्रेसच्या उमेदवार रजनी पाटील (Rajni Patil) यांचा उमेदवारी अर्ज छाननीत बाहेर पडेल, असे विधान भाजप (BJP) प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांनी केले आहे. त्यांच्या विधानामुळे राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा सुरु झाली आहे. पाटील यांचा अर्ज नेमका कोणत्या कारणामुळे छाननीत बाद होईल हे मात्र सांगण्यास पाटील यांनी नकार दिला आहे. काँग्रेसचे खासदार राजीव सातव यांच्या निधनामुळे रिक्त झालेल्या जागेसाठी भाजपने संजय उपाध्याय यांना उमेदवारी दिली आहे. त्यांचा उमेदवारी अर्ज दाखल करताना प्रसारमाध्यमांशी बोलताना चंद्रकांत पाटील यांनी हे विधान केले.

रजनी पाटील यांच्या उमेदवारीबाबत बोलताना पाटील यांनी दावा केला की, रजनी पाटील यांच्यवर काही ऑब्जेक्शन्स आहेत. त्यामुळे उमेदवारी अर्जांची छाननी करताना त्यांचा अर्ज बाद होईल. पाटील यांच्यावर नेमकी काय ऑब्जेक्शन्स आहेत असे प्रसारमाध्यमांनी खोदून विचारले असता, ते मी आजच का सांगू? काही उद्यासाठीही राहु द्या, असे म्हणत पाटील यांनी सस्पेन्स भलताच वाढवला आहे. (हेही वाचा, Rajya Sabha Bypolls 2021: राज्यसभेसाठी भाजपकडून संजय उपाध्याय यांना उमेदवारी, प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांची घोषणा)

उमेदवार निवडूण आणण्यासाठी भाजप आवश्यक मतांची जुळवाजुळव कशी करणार? असे विचारले असता, 'राजकारण आहे. राजकाणात काहीही होऊ शकते. 56 वाले मुख्यमंत्री होतात. 54 वाले उपमुख्यमंत्री होतात. 44 वाले महसूल मंत्री बनतात. तर मग 106 आणि 13 अपक्ष आमदार म्हणजे 119 आमदार होतात. मग 119 वालेही राज्यसभेत का जाऊ शकत नाहीत? भाजपचे संजय उपाध्याय हे राज्यसभा खासदार म्हणून निवडूण येतील आणि उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीत ते भाजप प्रचारास जातील', असा विश्वासही पाटील यांनी या वेळी व्यक्त केला.

भाजपने राज्यसभेसाठी उमेदवार देऊन महाराष्ट्राची परंपरा मोडली, अशी टीका काँग्रेसकडून केली जात आहे. यावर बोलताना चंद्रकांत पाटील म्हणाले आम्हाला परंपरेबाबत सांगितले जात असेल तर काँग्रेसने राजीव सातव यांच्या पत्नीला का उमेदवारी दिली नाही? राजीव सातव हे आमच्या प्रविण दरेकर, सुधीर मुनगंटीवार, संजय उपाध्याय, देवेंद्र फडणवीस यांचे मित्र होते. त्यामुळे सातव यांच्या पत्नीला तिकीट दिले जाईल अशी आमची आपेक्षा होती. परंतू, काँग्रेसने रजनी पाटील यांना तिकीट दिले, असे पाटील म्हणाले.

ट्विट

दरम्यान, भाजप कमी असलेल्या मतांचा कोटा कसा भरुन काढणार? असे विचारले असता राज्यसभा आणि राष्ट्रपती निवडणुकीत व्हीप मोडला तरी संबंधित मतदाराचे डिस्कॉलिफिकेशन होत नाही. त्यामुळे घाबरण्याचे कारण नाही. काही गोष्टी घडतील. दरम्यान, न गोष्टींचा शकून घडला. 12 निलंबित आमदारांना मतदानाचा अधिकार मिळाला. त्यांना फक्त आवारात जाता येणार नाही. गेटवर जाऊन मतदान करता येणार आहे, अशी माहितीही पाटील यांनी दिली.