आजकाल प्रत्येक देशातच सोशल मिडियाचा (Social Media) वापर मोठ्या प्रमाणावर वाढला आहे. याचे जसे काही तोटे आहेत तसेच याचे फायदेही आहेत. आता सोशल मिडियाचा फायदा अधोरेखित करणारे एक प्रकरण समोर आले आहे. कामानिमित्त परदेशात गेल्यानंतर 20 वर्षांपूर्वी बेपत्ता झालेल्या मुंबईतील (Mumbai) एका महिलेचा सोशल मीडियाच्या मदतीने पाकिस्तानात (Pakistan) शोध लागला आहे. पाकिस्तानातील हैदराबाद शहरात राहणाऱ्या 70 वर्षीय हमीदा बानो या 2002 मध्ये दुबईत घरकामासाठी काम करण्यासाठी शहर सोडून गेल्या होत्या.
आता तब्बल 20 वर्षानंतर मुंबईच्या कुर्ला उपनगरातील त्यांच्या कुटुंबाशी त्यांचा संपर्क होऊ शकला आहे. महिलेच्या कुटुंबीयांच्या म्हणण्यानुसार, वलीउल्लाह मारूफ हा पाकिस्तानमधील एक कार्यकर्ता बानो यांना भेटला होता व त्याच्याच मदतीने आता बानो यांच्या कुटुंबाला त्यांचा ठावठिकाणा लागला आहे. मारूफच्या म्हणण्यानुसार मुंबईतील एका एजंटने 20 वर्षांपूर्वी दुबईमध्ये कामाचे आश्वासन देऊन बानो यांची फसवणूक केली होती. यामुळे त्या दुबईऐवजी पाकिस्तानमध्ये पोहोचल्या.
परत माघारी फिरण्याचा कोणताही रस्ता नसल्याने नशिबाला दोष देत बानो पाकिस्तानच्या सिंध प्रांतातील हैदराबाद या प्रमुख शहरामध्ये राहू लागल्या. त्यानंतर तिथे त्यांनी एका स्थानिक पुरुषाशी लग्न केले, ज्याच्यापासून त्यांना एक मूल झाले. परंतु नंतर त्यांच्या पतीचा मृत्यू झाला. परंतु इतक्या वर्षांमध्ये त्यांची आपल्या घरी परत जाण्याची तळमळ होती. बानो यांची कहाणी ऐकून मारूफने बानो यांचा व्हिडिओ बनवला व तो त्याच्या YouTube चॅनेलवर अपलोड केला.
पुढे मारूफने मुंबईतील एका सामाजिक कार्यकर्त्याचा शोध घेतला जो त्याला मदत करू शकेल. त्यावेळी त्याची ओळख खफलान शेखशी झाली. शेखने हा व्हिडिओ त्याच्या स्थानिक ग्रुपमध्ये प्रसारित केला आणि त्याद्वारे कुर्ल्यातील कसाईवाडा भागात राहणाऱ्या बानोची मुलगी यास्मीन बशीर शेख हिच्याशी संपर्क होऊ शकला. यास्मिनने सांगितले, ‘माझ्या आईने 2002 मध्ये एजंटच्या माध्यमातून कामासाठी दुबईला जाण्यासाठी भारत सोडला. मात्र, एजंटच्या निष्काळजीपणामुळे ती पाकिस्तानात उतरली. आम्हाला तिचा ठावठिकाणा माहीत नव्हता आणि त्याच एजंटद्वारे फक्त एकदाच तिच्याशी संपर्क साधता आला.’ (हेही वाचा: Mumbai: देव तारी त्यास कोण मारी! 20 व्या मजल्यावरून खाली पडूनही महिला जिवंत, जाणून घ्या सविस्तर)
ती पुढे म्हणते, ‘आम्हाला आनंद आहे की आमची आई जिवंत आणि सुरक्षित आहे. तिला परत आणण्यासाठी भारत सरकारने आम्हाला मदत करावी अशी आमची इच्छा आहे.' आपल्या आईला परत आणण्यासाठी या कुटुंबाने पाकिस्तान उच्चायुक्तांकडे जाण्याची योजना आखली आहे.