Mumbai Local Train Update: सर्वसामान्यांनाही येत्या शुक्रवारपासून पश्चिम रेल्वेतून प्रवास करता येणार? महत्वाची माहिती आली समोर
Mumbai Local (Photo Credit - PTI)

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मुंबई लोकलमधून (Mumbai Local Trains) अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांसह पुरुषांच्या निवडक श्रेणी आणि महिलांना प्रवास करण्याची परवानगी आहे. मात्र, गेल्या कित्येक महिन्यांपासून मुंबईतील लोकल रेल्वे सेवा सर्वसामान्यांसाठी कधी सुरु करणार? असा प्रश्न सातत्याने उपस्थित करण्यात येत आहे. दरम्यान, मुंबईतील लोकल रेल्वे सेवा सर्वांसाठी सुरु करण्यासंदर्भात सोमवारी (25 जानेवारी) मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत आढावा घेण्यात आला होता. यावेळी यासंदर्भातील निर्णय लवकरच घेण्यात येईल, अशी माहिती मुख्यमंत्र्यांनी दिली होती. यातच येत्या शुक्रवारपासून (29 जानेवारी) आता सर्वांनाच पश्चिम लोकलमधून (Western Railway) प्रवास करण्याची मुभा मिळू शकते, अशी माहिती मुंबई मिररने आपल्या वृत्तात दिली आहे.

मुंबईतील लोकल रेल्वे सेवा सर्वांसाठी सुरु करण्यासंदर्भात उद्धव ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडलेल्या बैठकीला मुख्य सचिव संजय कुमार, मुख्यमंत्र्यांचे प्रधान सल्लागार अजोय मेहता, मुख्यमंत्र्यांचे अपर मुख्य सचिव आशिषकुमार सिंह, प्रधान सचिव विकास खारगे, सचिव आबासाहेब जराड, बृहन्मुंबई महानगरपालिका आयुक्त इक्बालसिंह चहल, आपत्ती व्यवस्थापन संचालक अभय यावलकर यांच्यासह मध्य रेल्वेचे महाव्यवस्थापक संजीव मित्तल, आणि पश्चिम रेल्वेचे महाव्यवस्थापक आलोक कंसल, मुंबई पोलीस आयुक्त परम बीर सिंह, यांच्यासह आरोग्य विभागाचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. हे देखील वाचा- कल्याण च्या पत्री पूलचंं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते लोकार्पण; नागरिकांची वाहतूक कोंडीतून होणार सुटका

कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव पाहता देशात 24 मार्च रोजी लॉकडाऊन घोषीत करण्यात आला होता. त्यानंतर मुंबईची लाईफलाईन अशी ओळख असणारी मुंबई लोकल कित्येक महिने बंदच होती. त्यानंतर राज्यात अनलॉकला सुरुवात झाल्यानंतर अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांना लोकलमधून प्रवास करण्याची परवानगी मिळाली. यातच आता महिलांनाही मर्यादित वेळेत लोकलमधून प्रवास करण्याची मुभा मिळाली आहे. मात्र, मुंबई लोकलमध्ये प्रवेश मिळत नसल्याने सर्वसामन्य मुंबईकरांचे प्रचंड हाल होत आहेत. शिवाय रस्त्यावर ट्रॅफिकमुळे मुंबईकरांचे अनेक तास हे प्रवासातच जात आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, पश्चिम रेल्वे मार्गावर सध्या 1 हजार 201 लोकल धावत आहेत. मात्र, येत्या शुक्रवारपासून हा आकडा 1 हजार 367 वर पोहचण्याची शक्यता आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आता मध्य रेल्वे आणि पश्चिम रेल्वेतून दररोज 20 लाख प्रवाशी प्रवास करतात. लॉकडाऊनपूर्वी मुंबई लोकलमधून प्रवास करणाऱ्यांची संख्या तब्बल 80 लाख इतकी होती.