Landslide at Dhamandevi: रायगड मधील धामणदेवी गावात दरड कोसळल्याने मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्ग रात्रीपासून ठप्प; दरड उपसण्याचे काम सुरु
Landslide at Dhamandevi village (Photo Credits: ANI)

रायगड (Raigad) जिल्ह्यातील पोलादपूर (Poladpur) तालुक्यात धामणदेवी (Dhamandevi) गावात काल (9 जुलै) रात्री 9.30 च्या सुमारास दरड कोसळल्याने मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्ग (Mumbai-Goa Highway) रात्रभर ठप्प होता. त्यानंतर आज (10 जुलै) सकाळी 6.30 वाजल्यापासून पोलिस आणि प्रशासनाकडून मार्गातील दरड हटवण्याचे काम सुरु झाले. आतापर्यंत 70% मार्ग मोकळा केल्याची माहिती रायगड पोलिसांनी (Raigad Police) दिली आहे.

पावसाळ्यात अनेकदा दरड कोसळण्याच्या घटना घडतात. त्यामुळे महामार्गावरील वाहतुकीवर त्याचा परिणाम होत असतो. गेल्या काही दिवसांपासून राज्यात मध्यम आणि मुसळधार अशा स्वरुपाचा पाऊस होत आहे. त्यामुळे दरड कोसळली असून पोलादपूर पोलिस, एलअँडटीची टीम घटनास्थळी दाखल झाली होती. त्यानंतर दरड उपसण्याचे काम सुरु करण्यात आले असल्याची माहिती महाराष्ट्र शासनाकडूनही देण्यात आली होती. (कशेडी घाटात दरड कोसळली, मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्ग रात्रभर ठप्प राहणार)

ANI Tweet:

दरम्यान दरड उपसण्याचे काम 70% झाले असून लवकरच मार्ग वाहतुकीसाठी मोकळा करण्यात येईल असा अंदाज आहे. गेल्या 2-3 दिवासांपासून मुंबई, कोकणात मुसळधार पाऊस बरसत आहे. मुंबईत जुलै महिन्याच्या पहिल्या 6 दिवसात 60% पाऊस पडला आहे. काही दिवसांनी पावसाचा जोर ओसरेल असा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे.