Mumbai Fire Deaths: गेल्या वर्षी मुंबईत 5,074 आगीच्या घटनांची नोंद; 33 जणांचा मृत्यू, सुमारे 300 जण जखमी
Fire | Representational Image | (Photo Credits: Pixabay)

Mumbai Fire: गेल्या वर्षी मुंबईत (Mumbai) 5,000 हून अधिक आगींच्या (Fire) घटना समोर आल्या आहेत. यामध्ये 33 जणांचा मृत्यू झाला असून, सुमारे 300 जण जखमी झाले. शहराच्या अग्निशमन दलाने याबाबत माहिती दिली आहे. आगीच्या घटना रोखण्यासाठी आणि जीवित आणि मालमत्तेची हानी कमी करण्यासाठी अग्निसुरक्षा नियमांची कठोर अंमलबजावणी करण्याचा सल्ला तज्ञांनी दिला आहे. देशाच्या आर्थिक राजधानीत गेल्या वर्षी 5,074 आगीच्या घटना नोंदवल्या गेल्या.

महानगरातील 2022 मधील अशा 4,417 घटनांच्या तुलनेत 2023 मध्ये 15 टक्क्यांनी वाढ झाली. गेल्या वर्षी 1 जानेवारी ते 31 डिसेंबर दरम्यान शहरात आगीच्या घटनांपैकी दिवाळी साजरी होत असताना नोव्हेंबर महिन्यात सर्वाधिक 655 घटना घडल्या. त्यापाठोपाठ फेब्रुवारीमध्ये 519 आणि जूनमध्ये 503 घटना घडल्या.

पश्चिम मुंबईतील गोरेगाव येथील जय भवानी एसआरए इमारतीला लागलेली आग ही अलीकडच्या काळातील सर्वात मोठी आगीची घटना होती. ऑक्टोबर 2023 मध्ये घडलेल्या या घटनेत आठ जणांचा मृत्यू झाला आणि अनेक जण जखमी झाले. गेल्या वर्षीच्या अशाच इतर मोठ्या घटनांपैकी 20 ऑक्टोबर रोजी बोरिवली पश्चिम येथील वीणा संतूर इमारतीला लागलेल्या आगीत तीन जणांना आपला जीव गमवावा लागला आणि काही जण जखमी झाले.

अग्निशमन दलाच्या आकडेवारीनुसार, आधीच्या काही वर्षांच्या तुलनेत 2023 मध्ये शहरात आगीच्या घटना, मृत आणि जखमींच्या संख्येत लक्षणीय वाढ झाली आहे. महानगरात 2022 मध्ये 4,417 घटना घडल्या, ज्यात 13 लोकांना आपला जीव गमवावा लागला आणि 160 जण जखमी झाले. 2021 मध्ये, 4,065 आगीच्या घटनांमध्ये 19 लोकांचा मृत्यू झाला आणि 173 लोक जखमी झाले. गेल्या तीन वर्षांत, आगीच्या घटनांमध्ये जवळपास 65 जणांना आपला जीव गमवावा लागला आहे, ज्यात 2023 मधील 33 जणांचा समावेश आहे.

मुंबई अग्निशमन दलाचे मुख्य अग्निशमन अधिकारी आर.एन. अंबुलगेकर म्हणाले की, शहरातील एकूण आगीच्या घटनांपैकी सुमारे 80 टक्के घटना विद्युतीय बिघाडामुळे घडतात. ते पुढे म्हणाले की मुंबई नागरी संस्था ऊर्जा विभागाशी समन्वय साधत आहे आणि इमारतींचे इलेक्ट्रिकल ऑडिट अनिवार्यपणे समाविष्ट करण्यासाठी दबाव टाकत आहे. (हेही वाचा: Trans Harbour Link Toll Charges: शिवडी-न्हावा शेवा सागरी सेतू टोलसह मंत्रिमंडळ बैठकीतील महत्त्वाचे 10 निर्णय, घ्या जाणून)

फायर सेफ्टी आणि इव्हॅक्युएशन तज्ज्ञ डॉ दीपक मोंगा यांनी सांगितले की, इव्हॅक्युएशन लिफ्ट, इलेक्ट्रिकल ऑडिट आणि फायर सेफ्टी उपकरणांची देखभाल आग आपत्कालीन परिस्थितीत अग्निशामकांना मदत करण्यासाठी उपयुक्त ठरेल. फायर इव्हॅक्युएशन लिफ्ट असल्‍याने अग्निशमन दलाला इमारतीमधून अधिक सहजतेने जाण्‍यात आणि उंच इमारतींमध्‍ये अग्निशामक आपत्कालीन परिस्थितीत रहिवाशांना जलद बाहेर काढण्‍यात मदत होईल.