Pigeon | (File Image)

प्राणी कल्याण कार्यकर्ते, स्वयंसेवी संस्था आणि पक्षीप्रेमी यांचा मोठा समूह या रविवारी संताक्रूज (पश्चिम) येथील दौलत नगर कबूतरखाना (Kabutar Khana) येथे पक्षांना “दाणे घालून शांत आंदोलन” करणार आहे. मुंबई महापालिका (BMC) कडून कबूतरांना दाणे घालण्यावर लादलेल्या बंदीच्या (Pigeon Feeding Ban) कारवाईविरोधात हा अनोखा निषेध नोंदवला जाणार आहे. आयोजकांच्या अंदाजानुसार, शेकडो कार्यकर्ते या आंदोलनात सहभागी होतील. राज्य सरकारने दिलेल्या तातडीच्या निर्देशांनुसार, शहरातील कबूतरखाने बंद करण्यासाठी BMC ने मोहीम सुरू केली आहे. याची सुरुवात दादर कबूतरखाना (Dadar Kabutar Khana) परिसरातील अतिक्रमण हटविणे आणि काही भाग पाडण्यापासून झाली होती. यानंतर, कबूतरांना दाणे घालणाऱ्या नागरिकांवर दंड आकारण्याची कारवाई सुरु झाली आहे.

यापूर्वी प्राणी हक्क संघटनांनी इशारा दिला होता की, कारवाई थांबवली नाही तर मोठ्या प्रमाणावर आंदोलन केले जाईल. मात्र, कारवाई सुरुच राहिल्याने कार्यकर्त्यांनी शांततापूर्ण पद्धतीने विरोध नोंदवण्याचा निर्णय घेतला आहे. यासाठी कबूतरांना अधिक प्रमाणात दाणे घालून हा निषेध व्यक्त केला जाणार आहे.

Pure Animal Lovers (PAL) Foundation या संस्थेच्या पुढाकाराने रविवारी दुपारी 3 वाजेपासून संध्याकाळी 5 वाजेपर्यंत संताक्रूज येथे मौन मोर्चा काढून कबूतरांना दाणे घालण्याचा कार्यक्रम होईल. संस्थेनुसार, 500 हून अधिक प्राणीप्रेमी, कार्यकर्ते आणि जैन समाजातील सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित राहतील अशी शक्यता आहे.

PAL Foundation चे प्राणी हक्क सल्लागार रोशन पाठक यांनी म्हटले, “BMC ची ही कारवाई कोणत्याही वैज्ञानिक अभ्यासाविना केली जात आहे. दाणे घालणाऱ्यांवर दंड करणे देखील बेकायदेशीर आहे. यामुळे निरपराध पक्षी उपासमारीने मरत आहेत आणि यासाठी महापालिकाच जबाबदार आहे. आमच्याकडे मिळालेला हा मूलभूत हक्क आहे आणि आम्ही तो पाळत आहोत.”