मुंबई किनारी रस्ता (दक्षिण) (Mumbai Coastal Road) हा प्रकल्प शामलदास गांधी मार्ग (प्रिन्सेस स्ट्रीट) उड्डाणपूल ते वांद्रे-वरळी सागरी सेतूच्या वरळी टोकापर्यंत बांधण्यात येत आहे. काल 26 जानेवारी रोजी धर्मवीर स्वराज्यरक्षक छत्रपती संभाजी महाराज मुंबई किनारी रस्त्याच्या उत्तर वाहिनीचे लोकार्पण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते झाले. किनारी रस्त्यामुळे मुंबईकरांच्या प्रवासाच्या वेळेत तसेच इंधनामध्ये मोठी बचत होणार असून, प्रदूषणापासून मुक्ती मिळण्यामध्ये हा मार्ग महत्त्वपूर्ण भूमिका बजावणार असल्याचे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले. यावेळी माध्यमांशी संवाद साधताना मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, मुंबई किनारी रस्त्याचे 94 टक्के काम पूर्ण झाले असून, उत्तरवाहिनी मार्गाचे उद्घाटन झाले आहे. प्रजासत्ताक दिनी हा मार्ग नागरिकांना समर्पित होत असून, आज सोमवार 27 जानेवारी पासून या मार्गासह अन्य तीन आंतरमार्गिका खुल्या होणार आहेत.
यामध्ये मरीन ड्राईव्ह कडून प्रभादेवीकडे जाण्यासाठीची आंतरमार्गिका, मरीन ड्राईव्ह कडून बिंदूमाधव ठाकरे चौकाकडे जाणारी आंतरमार्गिका तसेच बिंदूमाधव ठाकरे चौकातून सागरी सेतूला जोडणारी आणि वांद्रेच्या दिशेने जाणारी आंतरमार्गिका यांचा समावेश आहे. यासह फेब्रुवारी महिन्यात प्रभादेवी कनेक्टरचेही काम पूर्ण होऊन हा संपूर्ण रस्ता मुंबईकरांसाठी खुला होईल, असेही मुख्यमंत्र्यांनी सांगितले. (हेही वाचा: Mumbai Coastal Road Opened: मुंबई कोस्टल रोड पूर्ण खुला; मरीन ड्राईव्ह ते वांद्रे आता अवघ्या 10-15 मिनिटांत)
प्रकल्पाची वैशिष्ट्ये:
- रस्त्याची लांबी- 10.58 किमी
- मार्गिका (4+4) बोगद्यांमध्ये (3+3)
- पुलांची एकूण लांबी- 2.19 किमी
- बोगदे- दुहेरी बोगद्यांची लांबी प्रत्येकी 2.072 किमी, अंतर्गत व्यास- 11 मीटर
- आंतरमार्गिका- 3, एकूण लांबी- 15.66 किमी
- एकूण भरावक्षेत्र- 111 हेक्टर
- नवीन विहारक्षेत्र- 7.5 किमी
- हरितक्षेत्र- 70 हेक्टर
- भूमिगत वाहनतळांची संख्या- 4,
- एकूण वाहनक्षमता- 1800 चारचाकी
- प्रकल्पाचा एकूण खर्च 13,983 कोटी
प्रकल्पाचे फायदे:
- वेळेची सुमारे 70 टक्के बचत, तर इंधनात 34 टक्के बचत. याचे फलित म्हणून परकीय चलनाचीही बचत.
- ध्वनी प्रदूषण व वायुप्रदूषणात घट होण्यास मदत.
- 70 हेक्टर हरित क्षेत्राची निर्मिती.
- मुंबईकरांचे जीवनमान उंचावण्यासाठी हरितक्षेत्रात सायकल ट्रॅक, सार्वजनिक उद्याने, जॉगिंग ट्रॅक, खुले प्रेक्षागृह साकारण्यात येत आहेत. मुंबईकरांना नवीन विहारक्षेत्र लाभणार.
- सागरी संरक्षण भिंतीची उभारणी. यामुळे किनाऱ्याची धूप होणार नाही आणि समुद्राच्या उंच लाटांपासून प्रकल्पाचे संरक्षण होईल.