गुंतवणूकीचे (Investment) आमिष दाखवून सुमारे 30 कोटींची फसवणूक केल्याप्रकरणी एका व्यक्तीवर एमआरए मार्ग पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. आरोपी व्यक्तीने तक्रारदाराची फसवणूक तर केलीच होती याशिवाय तक्रारदाराच्या आईच्या (जी एक प्रसिद्ध वास्तु सल्लागार आहे) माध्यमातून अनेक लोकांशी संपर्क साधून त्यांचीही फसवणूक केली होती. आता या व्यक्तीवर गुन्हा दाखल झाला असून तो आर्थिक गुन्हे शाखेकडे (EOW) वर्ग करण्यात आला आहे. तक्रारदार, चित्करण खुराना जे, प्रसिद्ध अंकशास्त्रज्ञ आणि वास्तु सल्लागार बिंदू खुराना यांचा मुलगा आहे, त्यांनी सांगितले की, आकर्षक परताव्याच्या गुंतवणुकीच्या बहाण्याने त्यांच्या कुटुंबाची लाखो रुपयांची फसवणूक झाली आहे.
खुराना आणि त्यांच्या कुटुंबाने 2020 मध्ये जून ते डिसेंबर या कालावधीत सुमारे 60 लाखांची गुंतवणूक केली होती. सध्याच्या शेअर बाजारानुसार या पैशाचे मूल्य 13.8 कोटींहून अधिक आहे. फ्री प्रेस जर्नलशी बोलताना बिंदू खुराना यांनी सांगितले की, आरोपी सिद्धार्थ पिलानी हा त्यांच्या एका क्लायंटचा संदर्भ घेऊन त्यांच्याकडे आला होता. त्याने बिंदू यांना काही गुंतवणूक योजना शेअर केल्या होत्या आणि या योजना पुढे त्यांचे ग्राहक आणि इतर ओळखीच्या लोकांसोबत शेअर करण्यास सांगितले. (हेही वाचा: मंत्री बच्चू कडू यांच्यावर 1 कोटी 95 लाख रुपयांच्या अपहाराचा आरोप, गुन्हा दाखल)
ही एक ‘खरी’ गुंतवणूक योजना आहे यावर विश्वास ठेवून, बिंदू यांनी त्यांच्या कुटुंबासह यामध्ये पैसे गुंतवले आणि पिलानीचा संदर्भ इतर क्लायंटनाही दिला. अशाप्रकारे पिलानीला 170 पेक्षा जास्त ग्राहक मिळाले. या सर्वांनी या योजनेमध्ये पैसे गुंतवले होते व सुरुवातीला त्याचा त्यांना चांगला परतावादेखील मिळाला. त्यानंतर या लोकांनी आणखी पैसे गुंवण्यास सुरुवात केली. मात्र काही महिन्यांनंतर रिटर्न येणे बंद झाले तसेच पिलानीकडून कथितपणे कोणताही संपर्क साधला गेला नाही.
जेव्हा पिलानीचा शोध घेतला गेला तेव्हा त्याचा ठावठिकाणा सापडला नाही. त्यानंतर याबाबत पोलिसांत तक्रार दाखल केली गेली. तक्रारदाराने सांगितले की, पिलानीने गुंतवणुकीवर परतावा म्हणून फक्त 64.85 लाख परत केले होते, मात्र गुंतवलेल्या रकमेचे सध्याचे बाजारमूल्य 13.79 कोटी रुपये आहे. 170 हून अधिक गुंतवणूकदारांना याच पद्धतीनुसार फसवले गेले. पोलिसांना संशय आहे की पिलानीने या लोकांची साधारण 30 कोटी किंवा त्याहून अधिक रकमेची फसवणूक केली आहे.
आर्थिक गुन्हे शाखेने पिलानी आणि कॅपिटल बर्ग प्रोप्रायटरशिप फर्म विरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. एफआयआरनुसार, MPID कायद्याच्या कलमांसह, ते या प्रकरणाची चौकशी करत आहेत. याप्रकरणी अद्याप कोणालाही अटक करण्यात आलेली नाही.