
महाविकासआघाडी सरकारमधील राज्यमंत्री व अकोला (Akola) जिल्ह्याचे पालकमंत्री बच्चू कडू (Bacchu Kadu) यांच्यावर एक कोटी 95 लाख रुपयांचा अपहार करण्याचा आरोप करण्यात आला आहे. महत्त्वाचे म्हणजे या प्रकरणात बच्चू कडू यांच्यावर गुन्हाही दाखल झाला आहे. वंचित बहुजन आघाडीचे प्रदेश उपाध्यक्ष डॉ. धैर्यवर्धन पुंडकर यांनी दिलेल्या तक्रारीवरुन शहर कोतवाली पोलीस ठाण्यात भादंवि कलम 405,409, 420, 468, 471 अन्वये गुन्हा दाखल झाला आहे. न्यायालयाच्या आदेशानुसार केलेल्या कारवाई अंतर्गत हा गुन्हा दाखल करण्यात आला.
काय आहे प्रकरण?
जिल्हा परिषदेने जिल्हा नियोजन समितीकडे रस्ते कामाचा प्रस्ताव पाठविण्यात आला होता. या प्रस्तावात परस्पर बदल करुन अस्तित्वात नसलेल्या रस्त्यावरुन एक कोटी 95 लाख रुपयांचा अपहार केल्याचा बच्चू कडू यांच्यावर आरोप आहे. वंचित बहुजन आघाडीचे प्रदेश उपाध्यक्ष डॉ. धैर्यवर्धन पुंडकर यांनी याबाबत तक्रार दिली होती. मात्र, पोलिसांनी ही तक्रार घेण्याबाबत टाळाटाळ केली. त्यामुळे पुंडकर यांनी फौजदारी प्रक्रिया संहिता 156 (3) अंतर्गत हे प्रकरण अकोला न्यायालयात दाखल केले. दरम्यान, पालकमंत्री हे लोकसेवक असतात. त्यामुळे त्यांच्याविरोधात जर गुन्हा दाखल करायचा असेल तर त्यासाठी 90 दिवसांच्या आत राज्यपालांची मान्यता घेऊन गुन्हा दाखल करावा, असे आदेश न्यायालयाने दिले. (हेही वाचा, शिक्षण राज्यमंत्री बच्चू कडू यांना 2 महिन्यांच्या सश्रम कारावासाची शिक्षा; निवडणुकीत प्रतिज्ञापत्रात फ्लॅटची माहिती लपवल्याचा ठपका)
न्यायालयाचे आदेश प्राप्त होताच वंचितच्या काही नेत्यांनी राजभवनावर जाऊन राज्यपालांची भेट घेतली. त्यांनी या प्रकरणात लक्ष घालावे अशी विनंतीही राज्यपालांना केली. त्यानुसार राज्यपालांनी दस्तऐवज तयार करुन आवश्यक ती कारवाई करण्याबाबत आदेश प्रशासनाला दिले. दरम्यान, गुन्हे दाखल करावेत की नाही याबाबत राज्यपालांकडून उत्तर आले नाही. त्यामुळे न्यायालयाने पालकमंत्री बच्चू कडू यांच्याविरोधातील तक्रारीवर तपास करून अहवाल सादर करण्याचा आदेश दिला.