मुंबई शहरातील हवेची स्थिती ही दिवसेंदिवस खराब होत चालली आहे. यामुळे नागरिकांना मोठ्या प्रमाणावर आरोग्याच्या समस्यांना तोंड द्यावे लागत असल्याचे समोर आले आहे. मुंबई शहर आणि उपनगरात श्वसन आणि दम्याचे रुग्ण 30 ते 50 टक्क्यांनी वाढले आहेत. या पार्श्वभूमीवर डॉक्टरांनी नागरिकांना त्यांच्या आरोग्याची काळजी घेण्याचे आवाहन हे केले आहे. सध्या प्रदुषणाची स्थिती पाहता नागरिकांनी सकाळचे वॉक ही टाळावे असे देखील डॉक्टरांनी सांगितले आहे. (हेही वाचा -Mumbai AQI: हवेची गुणवत्ता खालावली, मुंबईतील मरीन ड्राईव्ह, सीएसटी परिसरात धुक्याचा थर, (Watch Video))
मान्सून संपल्यानंतर शहरातील हवेचा दर्जा ‘चांगल्या’वरून ‘मध्यम’ श्रेणीपर्यंत पोहोचला आहे. काही भागात हवेची गुणवत्ता ‘खराब’वरून ‘अत्यंत खराब’ श्रेणीत गेली आहे. यामुळे रुग्णांची संख्या वाढत असल्याचे डॉक्टरांनी सांगितले आहे. विशेषत: जे लोक आधीच फुप्फुसाच्या आजाराने त्रस्त आहेत, त्यांच्या समस्या वाढल्या आहेत. संपूर्ण शहराची हवा मध्यम दर्जाची असली, तरी कुलाबा, माझगाव, मालाड, चेंबूर आणि बीकेसी या भागातील हवेची वाईट दर्जाची नोंद करण्यात आली आहे. त्यामुळे या परिसरातील नागरिकांनी जास्त काळजी घेण्याची गरज आहे.
गेल्या तीन ते चार आठवड्यांपासून येणाऱ्या रुग्णांची मुख्य समस्या प्रदूषण आहे. ओपीडीतील संख्या सुमारे 50 टक्क्यांनी वाढली आहे. रुग्णाला ताप किंवा संसर्ग नसल्यास, हवेतील धूळ आणि कणांमुळे ॲलर्जी, दमा, सीओपीडी आणि इतर फुप्फुसांशी संबंधित आजारांनी ग्रस्त असलेल्या लोकांमध्ये खोकला आणि श्वासोच्छ्वासाचा त्रास वाढू लागला आहे.