मुंबईतील मोटार अपघात दावा न्यायाधिकरणाने (Motor Accident Claims Tribunal) 28 रुपयांच्या चेंजसाठी ऑटो चालकाशी झालेल्या वादानंतर, रिक्षाचा पाठलाग करताना मृत्यू झालेल्या 26 वर्षीय तरुणाच्या कुटुंबाला 43 लाख रुपये आणि व्याजाची भरपाई दिली आहे. 2016 साली मुंबईतील (Mumbai) विक्रोळी भागात राहणाऱ्या चेतन आचिर्णेकर या तरुणाला ऑटोरिक्षाचालकामुळे आपला जीव गमवावा लागला होता. चेतन एका सॉफ्टवेअर फर्ममध्ये काम करत होता. 23 जुलै 2016 रोजी सकाळी 1.30 च्या सुमारास चेतन मुंबई विमानतळावरून विक्रोळी पूर्व येथील त्याच्या राहत्या घरी ऑटो रिक्षाने परतत होता.
जेव्हा रिक्षा त्याच्या घरी पोहोचली तेव्हा भाडे 172 रुपये झाले होते. चेतनने ड्रायव्हरला दोनशे रुपये दिले. मात्र चालकाने आपल्याकडे सुट्टे पैसे नसल्याचे सांगून उर्वरित 28 रुपये परत करण्याऐवजी रिक्षा सुरू केली. चेतनने त्याला थांबण्यास सांगताच चालकाने रिक्षाचा वेग वाढवला. यादरम्यान ऑटोरिक्षा चेतनच्या अंगावर पडली आणि त्याचा जागीच मृत्यू झाला. ही वेदनादायक घटना चेतनच्या वडिलांनी स्वतःच्या डोळ्यांनी पाहिली. त्यानंतर या प्रकरणाची नोंद विक्रोळी पोलीस ठाण्यात करण्यात आली.
कुटुंबाच्या म्हणण्यानुसार, ऑटो रिक्षा मालक कमलेश मिश्रा आणि वाहनाचा विमा Future Generali India Insurance Co Ltd कडे असल्याने, दोघेही संयुक्तपणे नुकसान भरपाई देण्यास जबाबदार आहेत. अहवालानुसार, चेतनच्या कुटुंबीयांनी फ्युचर जनरल इंडिया इन्शुरन्स कंपनीकडून विम्याची रक्कम देण्याची मागणी केली, परंतु कंपनीने नकार दिला. ट्रिब्युनलला चेतनचे मृत्यू प्रमाणपत्र आणि पोस्टमॉर्टम अहवालात आढळून आले की, चेतनचा मृत्यू मोटार वाहन अपघातात झालेल्या दुखापतीमुळेच झाला आहे. (हेही वाचा: आता मुंबई मेट्रो स्टेशन्सच्या बाहेर सायकलची सुविधा; इच्छित स्थळी पोहोचण्यासाठी ऑटो-बस घेण्याची गरज नाही, जाणून घ्या दर)
एम.एम.चांदेकर यांच्या अध्यक्षतेखालील न्यायाधिकरणाने सांगितले की, ऑटोरिक्षा चालक हा उतावीळ, निष्काळजीपणा आणि अपघातास जबाबदार आहे. ऑटो चालकाकडे वैध ड्रायव्हिंग लायसन्स नसल्याचा दावाही विमा कंपनीने केला होता, पण कंपनी आपला दावा सिद्ध करू शकली नाही. अखेर न्यायाधिकरणाने चेतनच्या कुटुंबीयांच्या बाजूने निकाल दिला, ज्याद्वारे विमा कंपनी आणि ऑटोरिक्षा मालक कमलेश मिश्रा यांना संयुक्तपणे चेतनच्या कुटुंबीयांना 43 लाख रुपयांची भरपाई द्यावी लागेल. अपघाताच्या वेळी चेतनचा मासिक पगार 15,000 रुपये होता. ही बाब लक्षात घेऊन न्यायाधिकरणाने व्याजासह भरपाई निश्चित केली.