Mumbai Metro | Representational Image | (Photo Credits: ANI)

मुंबईत (Mumbai) आता मेट्रो 7 आणि मेट्रो 2A मधून उतरून ऑटो किंवा बसने जाण्याची गरज भासणार नाही. प्रवासी त्यांच्या गंतव्यस्थानी पोहोचण्यासाठी सायकल (Bicycles) सेवेचा वापर करू शकतात. मेट्रोमधील प्रवाशांना त्यांच्या गंतव्यस्थानापर्यंत कनेक्टिव्हिटी देण्यासाठी सरकार लवकरच या कॉरिडॉरच्या 18 स्थानकांवर 10-10 सायकलींची व्यवस्था करणार आहे. मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण (MMRDA) ने मेट्रो प्रवाशांना किफायतशीर दरात सायकली देण्यासाठी MyByk अॅपशी करार केला आहे.

या अॅपद्वारे प्रवासी स्टेशनवर पोहोचण्यापूर्वी सायकल बुक करू शकतात. एमएमआरडीएचे आयुक्त एसव्हीआर श्रीनिवास यांनी गुरुवारी या सेवेचा शुभारंभ केला. त्याचबरोबर प्रवासी संख्येच्या आधारेच सायकलची संख्या वाढवण्यात येणार असल्याचे एमएमआरडीएने सांगितले. मेट्रोचा कोणताही प्रवासी एक दिवस ते 90 दिवसांसाठी सायकल भाड्याने घेऊ शकतो. यासह सकाळी ऑफिसला जाताना भाड्याने सायकल घेऊन संध्याकाळी परतताना ती स्टेशन स्टँडवर सोडण्याची सुविधा आहे.

केवळ मेट्रो प्रवासीच नाही तर स्टेशनजवळ चित्रपट पाहण्यासाठी किंवा खरेदीसाठी जाणारे प्रवासीदेखील या सायकल सेवेचा लाभ घेऊ शकतात. सायकल भाड्याने घेण्यासाठी, प्रवाशांना प्रथम MyByk अॅप डाउनलोड करणे आवश्यक आहे. यानंतर, तुमची प्रोफाइल तयार करून तुम्हाला 500 रुपये जमा करावे लागतील. हे केल्यानंतर अॅपच्या माध्यमातून सायकल भाड्याने घेता येईल. जोपर्यंत तुमच्याकडे सायकल आहे तोपर्यंत तुम्हाला प्रति तास 2 रुपये भाडे द्यावे लागेल आणि त्यानंतर तुम्ही सायकल मेट्रो स्टेशनखाली पार्क करू शकता. (हेही वाचा: मुंबईकरांना आता CNG भरण्यासाठी पंपावर जाण्याची गरज नाही; लवकरच इंधनाची होणार होम डिलिव्हरी)

सायकलचे 1 दिवसाचे भाडे 45 रुपये आणि 7 दिवसांसाठी 299 रुपये आहे. जर तुम्हाला 30 दिवसांसाठी सायकल भाड्याने घ्यायची असेल, तर तुम्हाला 799 रुपये द्यावे लागतील. त्याच वेळी, 90 दिवसांसाठी सायकलचे भाडे 2249 रुपये आहे. मेट्रो स्टेशन जवळील ही सायकलची ही सुविधा मुंबईकरांसाठी खूप फायदेशीर ठरेल, यामुळे व्यायामही होईल आणि पैसेही वाचतील.