मुंबईतील नागरिकांसाठी दिलासादायक बाब समोर आली आहे. बृहन्मुंबई महानगरपालिकेने (BMC) केलेल्या पाचव्या सीरो सर्वेक्षणात (Fifth Sero Survey) 86 टक्के लोकसंख्येमध्ये कोविड-19 अँटीबॉडीज आढळल्या आहेत. बृहन्मुंबई शहरातील सर्व 24 वॉर्डांमधून 18 वर्षांपेक्षा जास्त वयाच्या सहभागींवर करण्यात आलेल्या सर्वेक्षणात आढळून आले की, ज्यांना लसीचे एक किंवा दोन डोस मिळाले होते त्यांच्यापैकी 90.26 टक्के लोकांमध्ये कोविड-19 अँटीबॉडीज आहेत. महत्वाचे म्हणजे ज्यांना लसीचा एकही डोस मिळाला नव्हता, अशा 79.86 टक्के लोकांमध्येही अँटीबॉडीज आढळल्या आहेत.
कोविड-19 विषाणू संसर्गजन्य रोगाच्या पार्श्वभूमीवर बीएमसीकडून महानगरपालिका क्षेत्रात पाचवे सीरो सर्वेक्षण करण्यात आले. रक्त नमुन्यांची चाचणी घेऊन त्यामध्ये कोरोना विरुद्धच्या अँटीबॉडीज शोधल्या जातात. 8,674 नमुन्यांच्या आधारावर झालेले हे सीरो सर्वेक्षण येणाऱ्या तिसऱ्या लाटेचा ट्रेंड ओळखण्यात महत्वाची भूमिका बजावू शकते.
सीरो सर्वेक्षणात समोर आलेल्या बाबी-
- शहरातील 86.64% लोकांमध्ये कोविड अँटीबॉडीज आढळल्या आहेत. यामध्ये झोपडपट्टीतील सुमारे 87.02% लोकांमध्ये आणि बिगर झोपडपट्टी भागांमध्ये सुमारे 86.22% लोकांमध्ये अँटीबॉडीज आढळल्या आहेत.
- सीरो सर्वेक्षणादरम्यान, 85.07 टक्के पुरुषांमध्ये अँटीबॉडीज आढळल्या आहेत, तर 88.29% स्त्रियांमध्ये अँटीबॉडीज आढळल्या आहेत. यावरून दिसत आहे की पुरुषांच्या तुलनेत स्त्रियांमध्ये तीन टक्क्यांहून अधिक अँटीबॉडीज आढळल्या आहेत.
- सीरो सर्वेक्षणामध्ये सहभागी झालेल्या लोकांपैकी सुमारे 65 टक्के लोकांना लस देण्यात आली होती, तर 35 टक्के लोकांना लस मिळाली नव्हती.
- 90.26 टक्के अंशतः आणि पूर्णपणे लसीकरण झालेल्या लोकांमध्ये अँटीबॉडीज आल्या आहेत.
- ज्या लोकांनी कोविड-19 लस घेतली नाही अशा 79.86 टक्के लोकांमध्ये अँटीबॉडीज आढळल्या आहेत.
- सीरो सर्वेक्षणात समाविष्ट झालेल्या एकूण लोकांपैकी 20% हेल्थकेअर वर्कर होते व त्यांच्यामध्ये अँटीबॉडीजची टक्केवारी 87.14 होती. (हेही वाचा: Coronavirus: कोरोनाने पती गेला, विरहाने व्याकूळ पत्नीची 18 महिन्यांच्या मुलीसोबत आत्महत्या; पुणे येथील शिक्षक दाम्पत्य उद्ध्वस्त)
यावरून दिसत आहे की, मुंबईतील सर्व 24 प्रशासकीय विभाग मिळून, झोपडपट्टी तसेच बिगर झोपडपट्टी परिसरांमध्ये अँटीबॉडीजचे प्रमाण खूप वाढले आहे.