एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील सरकारने राज्यातील सणांवरील सर्व कोविड-19 निर्बंध उठवल्यामुळे आता 11 ते 18 सप्टेंबर या कालावधीत मुंबईमध्ये होणाऱ्या वार्षिक माउंट मेरी मेळाव्याची (Mount Mary Fair) तयारी जोरात सुरू आहे. नुकतेच संपूर्ण शहरात गोकुळाष्टमी उत्साहात साजरी करण्यात आली, तर आता गणेशोत्सवाचे वेध लागले आहेत. माउंट मेरी जत्रेदरम्यान वांद्रे (पश्चिम) येथील माउंट मेरी चर्चच्या आजूबाजूला अनेक स्टॉल्स उभारले जातात. बीएमसीने अशा स्टॉल्ससाठी निविदा मागवण्यास सुरुवात केली आहे.
प्रत्येक वर्षीप्रमाणे नागरी संस्थेने चर्चच्या जवळच्या 20 स्टॉलसाठी प्रथम बोली सुरु केली, ज्याची किंमत 84,000 रुपयांवरून 97,000 रुपयांपर्यंत आहे. गेल्या काही वर्षांत, यापैकी अनेक स्टॉल्स 1 लाख रुपयांपेक्षा जास्त किमतीला विकले गेले आहेत. या स्टॉल्सवरून केवळ धार्मिक पुस्तके आणि इतर धार्मिक वस्तूंची विक्री करता येणार आहे. बीएमसीने उर्वरित 400 स्टॉल्सची किंमत 1,800 रुपयांवरून 2,250 रुपये केली आहे. (हेही वाचा: गणेशोत्सवासाठी कोकणात येणाऱ्या चाकरमान्यांचा दिलासा; रस्त्यांच्या दुरस्तीची कामे 25 ऑगस्ट 2022 पर्यंत पूर्ण करण्याचे निर्देश)
शतकाहून अधिक परंपरा असलेला हा उत्सव सप्टेंबरच्या दुसऱ्या रविवारी सुरू होतो. केवळ ख्रिश्चनच नव्हे तर सर्व धर्माचे लोक या कार्यक्रमासाठी गर्दी करतात. ही यात्रा मुंबईच्या सामाजिक आणि धार्मिक परंपरेचे मोठे आकर्षण आहे. माउंट मेरी जत्रेला वांद्रे जत्रा म्हणूनही ओळखले जाते. या वेळी दररोज किमान एक लाख लोक या ठिकाणी येतात. गेल्या काही वर्षांत मेणबत्त्या, फुले, खाद्यपदार्थ, खेळणी आणि कृत्रिम दागिन्यांची विक्री करणारे तब्बल 430 स्टॉल या मेळ्यात लावण्यात आले आहेत.
स्टॉल्ससाठी मुंबई उच्च न्यायालयाची मार्गदर्शक तत्त्वे आहेत. त्यानुसार, बीएमसीने स्थानिक रहिवाशांसाठी 260 स्टॉल ठेवले आहेत आणि उर्वरित स्टॉलसाठी बाहेरील लोकांना बोली लावण्याची परवानगी दिली आहे. दरवर्षी, बीएमसीला स्पर्धात्मक बोलीतून 30 लाखांहून अधिक महसूल मिळतो. सहाय्यक महापालिका आयुक्त विनायक विसपुते म्हणाले, ‘ही जत्रा सुरळीत पार पडावी यासाठी पोलीस आणि चर्च व्यवस्थापनासोबत बैठक घेतली जाणर आहे. रस्त्यांची दुरुस्ती आणि खड्डे बुजवण्याचे कामही चालू आहे.’