गणेशोत्सव (Ganeshotsav 2022) साजरा करण्यासाठी कोकणात येणाऱ्या चाकरमान्यांचा रस्तेमार्ग प्रवास अधिक सुखकर होण्यासाठी, कोकणातील रस्त्यांच्या दुरस्तीची कामे 25 ऑगस्ट 2022 पर्यंत पूर्ण करण्यात यावीत. सध्या या महामार्गावर खड्डे भरण आणि दुरस्तीची कामे कंत्राटदारांकडून सुरू आहेत. ही कामे अधिक जलद गतीने होण्यासाठी आवश्यकतेनुसार जास्तीत जास्त कंत्राटदारांकडून करून घ्या आणि पूर्ण ताकदीने आणि युद्धपातळीवर काम करा, अशा सूचना सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांनी आजच्या बैठकीत दिल्या.
मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गाच्या दुरुस्तीसंदर्भात आज सह्याद्री अतिथीगृह येथे बैठक पार पडली. मुंबई गोवा महामार्गाच्या दुरुस्तीसंदर्भात उपस्थित सर्व आमदार आणि खासदार यांनी आपापल्या मतदारसंघातील रस्त्यांच्या दुरुस्तीबाबत सूचना केल्या असून या सूचनांचा सकारात्मक विचार करून त्यावर तात्काळ आणि जलदगतीने निर्णय घेऊन काम करण्याच्या सूचना मंत्री चव्हाण यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाला केल्या.
याचबरोबर संपूर्ण महामार्गावर वाहतूक पोलिसांच्या मदतीसाठी जास्तीत जास्त ट्रॅफिक वॉर्डन तैनात करून वाहतूक व्यवस्थापन सुरळीत ठेवण्याचे आदेशही वाहतूक विभागाला देण्यात आले. रस्त्यांच्या दुरुस्तीची कामे ज्या ज्या कंत्राटदारांकडे देण्यात आली आहे, त्यांच्या कामावर नजर ठेवण्यासाठी सार्वजनिक बांधकाम विभागातील एक अभियंता नेमून देऊन या दोघांचीही नावे शासनाच्या संकेतस्थळावर टाकण्याचे निर्देशही मंत्री चव्हाण यांनी दिले. (हेही वाचा: Ganeshotsav 2022: प्रत्येक खड्ड्यासाठी आकाराला जाणार 2000 रुपयांचा दंड; BMC ने जारी केली गणपती मंडळांसाठी मार्गदर्शक तत्त्वे)
दरम्यान, मुंबईमध्येही गणेशोत्सवाची धूम दिसू लागली आहे. गणेशोत्सव सण जसजसा जवळ येत आहे, तसतशी गणपती मंडळे उत्सवासाठी विमा काढण्यासाठी गर्दी करत आहेत. उच्च विमा संरक्षण रकमेसह आघाडीवर असलेले शहरातील सर्वात श्रीमंत गणपती मंडळ आहे - GSB सेवा मंडळ, किंग सर्कल. इतर बहुतेकांनी समान विमा संरक्षण घेतले आहे. GSB सेवा मंडळाचे अमित पै यांनी सांगितले की, त्यांनी 316.40 कोटी रुपयांचे विमा संरक्षण घेतले आहे. प्रत्येक नैसर्गिक आपत्ती आणि इतर आपत्तीही यात कव्हर केली जाईल. विम्यामध्ये मंडप, देवाचे दागिने, कर्मचारी, भक्त आणि मंडळाची उपकरणे यांचा समावेश होतो.