Maharashtra Weather Update: राज्यात 4 किंवा 5 ऑक्टोबरपर्यंत मान्सून (Monsoon) हळूहळू माघार घेण्याची शक्यता आहे. भारतीय हवामानशास्त्र विभागाने (IMD) रविवारी यासंदर्भात अंदाज वर्तवला आहे. हवामान खात्याने सांगितले की, देशातील मान्सून 30 सप्टेंबर रोजी अधिकृतपणे माघारी जाईल. परंतु महाराष्ट्रात पाऊस सुरूच आहे. राज्यातील पावसाळा 4 किंवा 5 ऑक्टोबरपर्यंत हळूहळू माघार घेण्याची अपेक्षा आहे. हवामानशास्त्रज्ञ ज्योती सोनार यांनी एका व्हिडिओ निवेदनात म्हटले आहे की, महाराष्ट्रात अधिकृतपणे मान्सून 1 जूनपासून सुरू होतो आणि साधारणपणे 30 सप्टेंबरपर्यंत टिकतो. यावर्षी महाराष्ट्रातील किमान 9 जिल्ह्यांमध्ये तुलनेने कमी पाऊस झाला आहे. कोकण-गोवा पट्ट्यात सरासरीपेक्षा 18 टक्के जास्त पाऊस झाला आहे. मध्य महाराष्ट्राच्या पट्ट्यात सुमारे 12 टक्के कमी पाऊस झाला आहे. मराठवाड्यात 11 टक्के कमी पाऊस झाला आहे. याशिवाय विदर्भात सरासरीच्या तुलनेत 2 टक्के कमी पावसाची नोंद झाली आहे.
सोनार यांनी पुढे सांगितले की, या वर्षी पुण्यात सरासरी पाऊस झाला. पिंपरी-चिंचवडमध्ये 32 टक्के जास्त पाऊस झाला. दरम्यान, यंदाच्या पावसाळ्यात मुंबईने कोरडेपणाचा काळ अनुभवला असला तरी, शहराला पाणीपुरवठा करणारे तलाव तांत्रिकदृष्ट्या पावसाळ्याच्या शेवटच्या दिवशी म्हणजे सप्टेंबरच्या शेवटच्या दिवशी जवळजवळ भरले आहेत. त्यामुळे पुढील पावसाळ्यापर्यंत पाणीकपात होणार नाही, असे आश्वासन पालिकेने दिले आहे. (हेही वाचा - Jayakwadi Dam Water Level: जायकवाडी धरणाचा पाणीसाठा वाढला, पाण्याची आवक घटली)
मुंबईला एकूण सात तलावातून पाणीपुरवठा केला जातो. या तलावाची एकत्रित क्षमता 14.47 लाख दशलक्ष लिटर पाणीसाठा करण्याची आहे. हे तलाव 99.23 टक्के भरले असून शनिवारी साठा 14.36 लाख दशलक्ष लिटरवर पोहोचला आहे. बीएमसीच्या हायड्रोलिक विभागातील एका अधिकाऱ्याने सांगितले की, पावसाळ्याच्या शेवटच्या दिवशी हा साठा 100 टक्क्यांवर पोहोचला तर शहराला अखंड पाणीपुरवठा होतो.
तथापी, बीएमसीच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले की, तलाव त्यांच्या क्षमतेनुसार भरले असल्याने पुढील पावसाळ्यापर्यंत शहराला पाणीकपातीचा सामना करावा लागणार नाही. गेल्या वर्षी, तलावांमध्ये सप्टेंबर अखेरीस 98.5 टक्के साठा होता. त्यामुळे जून 2023 अखेरपर्यंत शहराला पाणीकपातीचा सामना करावा लागला नाही. पावसाच्या विलंबामुळे 5 जुलै रोजी पाणीकपात लागू करण्यात आली होती. ही पाणीकपात महिनाभर चालली होती. जुलैच्या पहिल्या आठवड्यात तलावाची पातळी केवळ सात टक्क्यांवर गेली. परंतु, जुलैमधील मुसळधार पाऊस आणि त्यानंतर ऑगस्ट आणि सप्टेंबरमध्ये अधूनमधून पडणाऱ्या पावसामुळे सप्टेंबरच्या अखेरीस तलाव भरण्यास मदत झाली.