मनसे आपला झेंडा बदलणार? काय असणार राज ठाकरे यांची पुढील रणनीती? वाचा सविस्तर
MNS | (Photo Credits: commons.wikimedia)

मराठी माणसांच्या न्याय हक्कांकरिता लढा देण्यासाठी 9 मार्च 2006 रोजी राज ठाकरे यांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेना (मनसे) या पक्षाची स्थापना केली. पक्षाचा सुरुवातीचा प्रवास जसा आक्रमक होता तसाच तो बदलत्या काळासोबत मावळात गेला. 2009 साली राज ठाकरे यांच्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने विधानसभा निवडणूक लढवली आणि त्यांचे 13 आमदार निवडून आले. परंतु, नुकत्याच पार पडलेल्या निवडणुकीत मात्र पक्षाला एकाच जागी समाधान मानावे लागले. त्यामुळे राज ठाकरे आता पक्षाची रणनीती लवकरच बदलणार असल्याची चर्चा सध्या राजकीय वर्तुळात पाहायला मिळत आहे.

राज ठाकरे आता फक्त मराठीच नाही तर हिंदुत्वाचा मुद्दा हाती घेऊन पुढची राजकीय खेळी खेळणार असल्याचे बोलले जात आहे. पक्षाच्या रणनीती सोबतच ते  मनसेच्या झेंड्यांचा रंगही भगवा किंवा केशरी करणार असल्याची माहिती मिळत आहे.

त्यासाठी राज ठाकरे यांनी शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीदिनी म्हणजेच 23 जानेवारी रोजी आपल्या पक्षाचे पहिले महाअधिवेशन गोरेगाव येथील नॅस्को मैदानावर आयोजित केले आहे.

मनसे अध्यक्ष राज ठाकरे दिसणार नव्या भूमिकेत? पाहा या संदर्भात काय म्हणाले संदीप देशपांडे

दरम्यान, नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीनंतर शिवसेना आणि भाजप यांच्यातील युती तुटली. शिवसेनेने हिंदुत्वाचा मुद्दा बाजूला सारत काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस या दोन्ही पक्षांशी हातमिळवणी केली. तर दुसरीकडे भाजप एकटी पडली. निवडणुकीच्या प्रचार काळात राज ठाकरे यांनी भाजपच्या विरुद्ध आक्रमक भूमिका घेतली होती. परंतु, आता मात्र पक्षाचे अस्तित्व टिकवण्यासाठी राज ठाकरे यांची भाजपबाबत असलेली भूमिका मवाळ होण्याची शक्यता आहे. इतकंच नव्हे तर हिंदुत्वाच्या मुद्यावर मनसे भाजपसोबतही जाऊ शकते असं म्हणायला हरकत नाही.