मनसे अध्यक्ष राज ठाकरे दिसणार नव्या भूमिकेत? पाहा या संदर्भात काय म्हणाले संदीप देशपांडे
MNS Chief Raj Thackeray | (Photo Credits: Facebook)

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पक्षाचं समीकरण बदलायचं ठरवलं आहे. आजवर त्यांच्या पक्षाने मराठी माणसाच्या न्यायहक्कासाठी लढा दिला आहे. परंतु आगामी काळात ते हिंदुत्वाच्या राजकारणाकडे झुकण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. कारण मनसेचे नेते संदीप देशपांडे यांनी अलीकडेच यावर खुलासा केला आहे. त्यांनी सांगितल्यानुसार, शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त 23 जानेवारी रोजी राज ठाकरे यांनी पक्षाचं पहिलं महाअधिवेशन आयोजित केलं आहे. संदीप यांनी सांगितल्यानुसार, या महाअधिवेशनापासून जनतेला नव्या स्वरुपातील राज ठाकरे पाहायला मिळणार आहेत.

टीव्ही 9 मराठी या वृत्तवाहिनीने या संदर्भातील वृत्त दिलं आहे. मनसेचं पहिलं अधिवेशन हे 23 जानेवारी रोजी  हे मनसेचं पहिलं अधिवेशन गोरेगाव येथील नॅस्को मैदानावर आहे. मुख्य म्हणजे या अधिवेशनाला राज्यभरातून मोठ्या संख्येने मनसैनिक हजेरी लावणार आहेत.

या अधिवेशनाबद्दल बोलताना संदीप देशपांडे म्हणाले की, “राज ठाकरे यांनी आझाद मैदानावर मोर्चा काढला तेव्हाही अशीच चर्चा सुरू होती. त्यावेळी राज ठाकरेंनी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा मन सैनिक ‘महाराष्ट्र धर्म’ मानतो आणि त्याच धर्मासाठी लढतो, असं स्पष्ट केलं होतं. आम्ही काही धर्म बदलला नाही. हे काही भगवं राजकारण वगैरे काही नाही. महाराष्ट्रधर्म हाच आमचा विचार आहे. महाराष्ट्र धर्मासाठी लढू आणि जो संघर्ष करायचा तो आम्ही निश्चित करू.”

नागरिकत्व कायद्यावरून मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची अमित शहांवर उपहासात्मक टीका; आर्थिक मंदीवरून लक्ष हटवण्यासाठी खेळी असल्याचंं सांगत हल्लाबोल

दरम्यान, शिवसेनेने महाराष्ट्रात सरकार बनवण्यासाठी काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस या दोन पक्षांसोबत युती केली. परंतु, या युतीमुळे शिवसेनेचा दुखावलेला कट्टर हिंदुत्ववादी मतदार मनसेकडे खेचण्यासाठी हा प्रयत्न असणार आहे अशी चर्चा सध्या राजकीय वर्तुळात पाहायला मिळत आहे.