नागरिकत्व कायद्यावरून मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची अमित शहांवर उपहासात्मक टीका; आर्थिक मंदीवरून लक्ष हटवण्यासाठी खेळी असल्याचंं सांगत हल्लाबोल
Raj Thackeray (Photo Credits: PTI/File)

नागरिकत्त्व कायदा लागू केल्यानंतर देशभर वाढत चाललेल्या तणावग्रस्त परिस्थितीवर मनसेची भुमिका स्पष्ट करताना राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी अमित शहा (Amit Shah) यांच्यावर उपहासात्मक टीका केली आहे. आर्थिक मंदी सारख्या गंभीर प्रश्नावरून लक्ष हटवण्यासाठी हा कायदा अस्तित्त्वात आणणं ही अमित शहांची उत्तम खेळी असल्याचं त्यांनी म्हटलं आहे. तसंच मोर्च्यामधील मुस्लीम नेमके कोण? यावरही प्रश्नचिन्ह उभं केलं आहेत. तसेच केंद्र सरकारसोबतच इतर राजकीय पक्षांनी राजकारण करू नये असं म्हटलं आहे. दरम्यान पोलिसांचे हात बांधले गेले असल्याने ते कारवाई करू शकत नाही असा दावा देखील राज ठाकरे यांनी केला आहे. 'शांतता, सुव्यवस्थेला गालबोट लागेल, असे वागू नका' मु्ख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडून अंदोलनकर्त्यांना आवाहन.   यासोबतच 23 जानेवारीला मनसेचे अधिवेशन मुंबईत होणार असल्याची घोषणा राज ठाकरे यांनी केली आहे. मात्र त्याबद्दल येत्या काही दिवसात सविस्तर माहिती जाणार आहे.

 आधारकार्ड हे देशाचं नागरिकत्वाचा पुरावा नसेल तर त्याचा उपयोग काय? असे म्हणत राज ठाकरेंनी त्याच्यावरून सरकारवर टीकास्त्र धाडलं आहे. दरम्यान 135 कोटी लोकसंख्या असलेल्या भारत देशामध्ये अजून नागरिक समाविष्ट करता येऊ शकत नाही? भारत देश काय धर्मशाळा आहे का? असा सवाल त्यांनी थेट मोदी सरकारला विचारला आहे.  बाहेरच्या लोकांना आपल्या देशात ठेवणार कुठे? असा प्रश्न उपस्थित करताना 'मायग्रेशन अ‍ॅक्ट' वर देखील प्रश्न विचारत भाजपाला राजकारण करू नका असं आवाहन केलं आहे. महाराष्ट्रात अस्थिरता निर्माण होण्याचं कारण नव्हतं मग राज्यात हे काय चाललय? असा प्रश्न राज ठाकरेंनी उपस्थित केला आहे. तसेच भाजपासोबत इतर राजकीय पक्षांनीदेखील हवा देऊ नये असं त्यांनी म्हटलं आहे.

नागरिकत्व कायद्यासोबतच पत्रकार परिषदेदरम्यान राज्यातील महाविकास आघाडी सरकारवरही भाष्य करताना शिवसेना, भाजपाने महाराष्ट्रातील जनतेचा अपमान केल्याचं म्हटलं आहे. तर या सार्‍याचा परिणाम पुढील मतदानावर होईल असं म्हटलं आहे.