MNS Replies to Sanjay Raut: राज ठाकरे यांच्या राज्यपाल भेटीवर टीका करणाऱ्या संजय राऊत यांना मनसे कडून खास फोटो ट्विट करत प्रत्युत्तर
Sanjay Raut & Raj Thackeray (Photo Credits: Facebook, IANS)

राज्याचे प्रश्न घेऊन राज्यपालांना भेटणे हा महाराष्ट्राचा अपमान आहे, अशा शब्दांत शिवसेना खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी नामोल्लेख टाळत मनसे अध्यक्ष राज ठाकरे (MNS Chief Raj Thackeray) यांच्यावर टीका केली. पुण्यातील पत्रकार परिषदेत त्यांनी राज ठाकरे यांच्या राज्यपाल भेटीवर भाष्य केले. याचे प्रत्त्युतर मनसेने हटके स्टाईलने दिले आहे. मनसे नेते संदीप देशपांडे (MNS Leader Sandeep Deshpande) यांनी संजय राऊत यांनी काही दिवसांपूर्वी घेतलेल्या राज्यपाल भेटीचा फोटो ट्विट केला असून 'महाराष्ट्राचा अपमान करताना खुद्द संजय राऊत' असं म्हटलं आहे.

दरम्यान, वाढील वीज बिलाच्या मुद्द्यावरुन मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी गुरुवारी (29 ऑक्टोबर) राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची भेट घेतली होती. त्यावर भाष्य करताना संजय राऊत म्हणाले की, "सरकार लोकनियुक्त आहे, लोकांनी निवडून दिलेलं आहे. त्यामुळे राज्यातील कोणत्याही प्रश्नासंबंधी मुख्यमंत्र्यांना भेटलं पाहिजे. राज्यपालांना कार्यकार अधिकार नाही. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे राज्याचे प्रमुख असताना राज्यपालांना भेटणे अयोग्य आहे. राज्याचे प्रश्न घेऊन राज्यपालांना भेटणे हा महाराष्ट्राचा अपमान आहे." त्यावर राऊतांना मनसेने चांगलेच उत्तर दिले आहे.

मनसे नेते संदीप देशपांडे ट्विट:

दरम्यान, राज ठाकरे यांनी राज्यपाल भेटीत सर्वसामान्यांना वाढीव वीज बिलातून दिलासा द्यावा, अशी मागणी केली होती. तसंच त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्याशी देखील फोनवर चर्चा केली. ('शरद पवार यांना भेटा' राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांनी राज ठाकरे यांना सूचवले)

पुण्यातील पत्रकार परिषदेत संजय राऊत यांनी अनेक मुद्द्यांना हात घातला. राज ठाकरे यांच्या राज्यपाल भेटीवर रोखठोक भाष्य करणाऱ्या संजय राऊत कंगना रनौत, बिहार निवडणुक या मुद्दयावरही बोलले. दरम्यान, मुख्यमंत्री नेत्यांचे काम करत नाहीत म्हणूनच राज्यपालांकडे जाण्याची वेळ घेते अशा शब्दांत विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी देखील संजय राऊत यांच्या त्या वक्तव्याचा समाचार घेतला आहे.