Bhagat Singh Koshyari, Sharad Pawar, Raj Thackeray | (Photo Credits: Archived, edited, symbolic images)

राज्यातील नागरिकांना येणाऱ्या वाढीव वीजबिलासंदर्भात आपण शरद पवार (Sharad Pawar) यांना भेटा, असे राज्यपाल भगत सिंह कोश्यारी (Bhagat Singh Koshyari) यांनी राज ठाकरे (Raj Thackeray) यांना सुचवले आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेना (MNS ) अध्यक्ष राज ठाकरेयांनी आज राज्यपाल कोश्यारी यांची भेट घेतली. या भेटीनंतर राज ठाकरे यांनी प्रसारमाध्यमांना माहिती दिली. या वेळी बोलताना ते म्हणाले, 'राज्यातील नागरिकांना येणाऱ्या वाढीव वीजबिलासंदर्भात ही भेट होती. ही प्राथमिक स्वरुपातील भेट होती. या भेटीत केवळ वाढीव वीजबिरासंदर्भातच चर्चा झाली' हे त्यांनी आवर्जून सांगितले.'

वाढीव विजबीलासंदर्भात बोलताना राज ठाकरे म्हणाले की, राज्यपालांनी या संदर्भात शरद पवार यांच्याशी बोलण्यास सांगितले. त्यामुळे मी शरद पवार यांच्याशी प्रत्यक्ष अथवा फोनवर बोलणार आहे. त्यासोबतच वेळ पडल्यास मुख्यमंत्र्यांनाही भेटणार आहे. राज्यात अनेक अनेक प्रश्न आहेत. परंतू त्यावर योग्य पद्धतीने विचार होऊन निर्णय व्हायला पाहिजे, असे राज ठाकरे या वेळी म्हणाले.

दरम्यान, राज्य सरकार नेमके निर्णय घेत नाही. अनेक गोष्टींमध्ये धरसोड करत आहे. असे कुंथत कुंथत सरकार चालत नाही. काय तो ठाम निर्णय घ्यायला पाहिजे असे राज ठाकरे या वेळी म्हणाले. तसेच, सरकारने मंदिरे, शाळा आणि इतर गोष्टी कधी उघडणार आहात याबाबत स्पष्ट काय ते एकदा राज्याच्या जनतेला सांगायला हवे असेही राज ठाकरे यांनी या वेळी सांगितले. (हेही वाचा, Raj Thackeray Will Meet Governor Bhagat Singh Koshyari: महाराष्ट्र नवनिर्माण सेना अध्यक्ष राज ठाकरे घेणार राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांची भेट)

राज्यात लॉकडाऊन सुरु असताना राज्यातील विविध संस्था, संघटनांनी राज ठाकरे यांची भेट घेतली होती. यात जीम चालक-मालक, मंदिरे उघडा अशी मागणी करणाऱ्या संघटना त्यासोबतच इतरही अनेकांचा समावेश होता. त्यामुळे राज्यपाल आणि राज ठाकरे यांना भेटायला आलेल्या लोकांची भावना एकच होती की मंदिरे उघडा. आता या भेटीत काय चर्चा होते याबाबत उत्सुकता होती.

दरम्यान, राज्यपाल भगत सिंह कोश्यारी हे सध्या भलतेच चर्तेत आहेत. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना लिहिलेले पत्र असो, त्याला मुख्यमंत्र्यांनी दिलेले प्रत्युत्तर असो किंवा शरद पवार यांना राज्यपालांनी पाठवलेल्या कॉफी टेबल पुस्तकावार पवारांनी दिलेला अभीप्राय असो. राज्यपाल चर्चेत आहेत. शिवसेना दसरा मेळाव्यातही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यपालांचे नाव न घेता जोरदार फटकेबाजी केली होती. त्यामुळेही राज्यपाल चर्चेत आहेत. आता राज ठाकरे यांच्या भेटीमुळे कोण चर्चेत येते किंवा राहते याबाबतही उत्सुकता कायम आहे.