राज्यातील विरोधी पक्षनेते आणि भारतीय जनता पक्षासहर राज्यातील विविध व्यक्तींनी राज्यपाल भगत सिंह कोश्यारी (Bhagat Singh Koshyari ) यांची भेट घेतली. त्यानंतर आता महाराष्ट्र नवनिर्माण सेना (Maharashtra Navnirman Sena) अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) हेसुद्धा राज्यपालांची भेट घेणार आहेत. मनसे (MNS) अध्यक्ष राज ठाकरे हे राज्यपालांना आज (गुरुवार, 29 ऑक्टोबर) भेटणार आहेत. मात्र, राज ठाकरे हे कोणत्या मुद्द्यावर राज्यपालांना भेटणार आहे याबाबत अद्याप माहिती पुढे येऊ शकली नाही.
राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांनी राज्यातील मंदिर उघडण्याबाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहिले होते. यात त्यांनी मंदिरे उघडण्याबाबत त्यांना भेटलेल्या लोकांचा उल्लेख केला होता. या पत्रास मुख्यमंत्री ठाकरे यांनी दिलेले उत्तरही तितकेच रोकठोक दिले होते. (हेही वाचा, Colors Channel Apologized: बिग बॉस कार्यक्रमात मराठीचा अपमान; शिवसेना, मनसेच्या इशाऱ्यानंतर कलर्स टीव्हीकडून माफीनामा, मुख्यमंत्र्यांना लिहिले पत्र)
राज्यात लॉकडाऊन सुरु असताना राज्यातील विविध संस्था, संघटनांनी राज ठाकरे यांची भेट घेतली होती. यात जीम चालक-मालक, मंदिरे उघडा अशी मागणी करणाऱ्या संघटना त्यासोबतच इतरही अनेकांचा समावेश होता. त्यामुळे राज्यपाल आणि राज ठाकरे यांना भेटायला आलेल्या लोकांची भावना एकच होती की मंदिरे उघडा. आता या भेटीत काय चर्चा होते याबाबत उत्सुकता आहे.
दरम्यान, राज्यपाल भगत सिंह कोश्यारी हे सध्या भलतेच चर्तेत आहेत. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना लिहिलेले पत्र असो, त्याला मुख्यमंत्र्यांनी दिलेले प्रत्युत्तर असो किंवा शरद पवार यांना राज्यपालांनी पाठवलेल्या कॉफी टेबल पुस्तकावार पवारांनी दिलेला अभीप्राय असो. राज्यपाल चर्चेत आहेत. शिवसेना दसरा मेळाव्यातही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यपालांचे नाव न घेता जोरदार फटकेबाजी केली होती. त्यामुळेही राज्यपाल चर्चेत आहेत. आता राज ठाकरे यांच्या भेटीमुळे कोण चर्चेत येते किंवा राहते याबाबतही उत्सुकता कायम आहे.