Adar Poonawalla यांनी केलेल्या गंभीर आरोपांबाबत मंत्री जितेंद्र आव्हाड यांचे ट्वीट; म्हणाले- 'देशाला याबाबतचे सत्य कळायला हवे'
Adar Poonawalla आणि Minister Jitendra Awhad (संग्रहित संपादित प्रतिमा)

कोरोना विषाणूविरुद्ध लढण्यासाठी भारतामध्ये मोठ्या प्रमाणात लसीकरण मोहीम सुरु आहे. देशात सीरम आणि भारत बायोटेक अशा दोन कंपन्या लसींचा पुरवठा करीत आहेत. मात्र वाढत्या मागणीला लसीचा पुरवठा करणे अवघड ठरत आहे. अशात सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाचे (Serum Institute of India) सीईओ अदार पूनावाला (Adar Poonawalla) यांनी आपल्याला लसीच्या पुरवठ्यासाठी धमक्यांचे फोन येत असल्याचे सांगितले आहे. पूनावाला यांच्या या आरोपांनंतर राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. याबाबत मंत्री जितेंद्र आव्हाड (Dr.Jitendra Awhad) यांनी ट्वीट करत सत्य काय ते बाहेर यायलाच हवे अशी मागणी केली आहे.

पूनावाला सध्या लंडनमध्ये आहेत व त्यांनी टाइम्स, यूकेला दिलेल्या मुलाखतीत हे गंभीर आरोप केले आहेत. याच मुद्द्यावर आव्हाड यांनी ट्वीट करत म्हटले आहे की, ‘सिरम इस्टिट्यूटचे अदर पुनावाला लंडनला निघून गेलेत अशी बातमी आहे. द टाईम्सला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी म्हटलं आहे की मला धमक्या मिळत आहेत, आणि सत्य बोललो तर शीर कापले जाईल. NDTV चे पत्रकार रविष कुमार यांनी सुध्दा या संदर्भात पोस्ट केली आहे... देशाला हे कळायला हव खरे की खोटे.’

पूनावाला यांनी टाईम्सच्या मुलाखतीमध्ये सांगितले की, कोव्हिशिल्ड (Covishield) लसीच्या पुरवठ्याबाबत आमच्यावर प्रचंड दबाव टाकला जात आहे. इतकेच नव्हे तर लसीच्या मागणीसाठी देशातील मुख्यमंत्री, मोठे व्यावसायिक यांच्यासह 'सर्वात शक्तिशाली' लोकांकडून धमक्यांचे फोन येत आहेत. या मुलाखतीमध्ये असे प्रतीत झाले की, पूनावाला भारताबाहेर कोरोना लस कोव्हिशिल्ड तयार करण्याची योजना आखत आहे. (हेही वाचा: Adar Poonawalla यांचा धक्कादायक खुलासा- 'देशातील मुख्यमंत्र्यांसह मोठे व्यावसायिक, शक्तिशाली लोकांकडून येत आहेत धमक्यांचे फोन')

सध्या देशात 18 ते 44 या वयोगटातील लोकांना लसीची परवानगी दिली आहे, त्यानंतर लसीची मागणी मोठ्या प्रमाणात वाढली आहे. परिणामी लस उत्पादक कंपन्यांवर लसीच्या मोठ्या प्रमाणातील उत्पादनाची जबाबदारी वाढली आहे. याचबाबत, ‘माझ्या खांद्यावर फार मोठे ओझे आहे व हे मी एकटा करू शकणार नाही’, असेही पूनावाला म्हणाले आहेत. या सर्व बाबी लक्षात घेता कंपनी आता देशाबाहेरही लस बनवण्याचा विचार करीत आहे.