Adar Poonawalla यांचा धक्कादायक खुलासा- 'देशातील मुख्यमंत्र्यांसह मोठे व्यावसायिक, शक्तिशाली लोकांकडून येत आहेत धमक्यांचे फोन'
SII CEO Adar Poonawalla (Photo Credits: ANI)

सध्याच्या कोरोना विषाणू (Coronavirus) लढाईमध्ये ‘लसीकरण’ ही देशाची मुख्य गरज बनली आहे. देशात दोन कंपन्यांद्वारे बनवलेल्या लसींचा वापर होत आहे. मात्र अचानक वाढलेल्या मागणीसाठी त्या प्रमाणात पुरवठा होत नाही. आता सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाचे (Serum Institute of India) सीईओ अदार पूनावाला (Adar Poonawalla) यांनी सांगितले की, त्यांच्यावर मोठ्या प्रमाणात लस उत्पादन करण्यासाठी दबाव टाकला जात आहे. टाइम्स, यूकेला दिलेल्या मुलाखतीत पूनावाला यांनी याबाबत माहिती दिली. अदार पूनावाला यांनी सांगितले की, कोव्हिशिल्ड (Covishield) लसीच्या पुरवठ्याबाबत आमच्यावर प्रचंड दबाव टाकला जात आहे. इतकेच नव्हे तर देशातील मुख्यमंत्री, मोठे व्यावसायिक यांच्यासह 'सर्वात शक्तिशाली' लोकांकडून धमक्यांचे फोन येत असल्याचेही त्यांनी सांगितले.

फोन कॉल्सचा संदर्भ देत पूनावाला म्हणाले की, कोव्हिशिल्ड लस मिळण्याची अपेक्षा आणि त्याबाबतच्या आक्रमकपणाची पातळी अभूतपूर्व आहे. कॉलवरील धमक्यांबाबत ते म्हणाले, ‘आम्हाला लस मिळाली नाही तर त्याचे परिणाम चांगले होणार नाहोत, अशा धमक्यांचे हे फोन आहे. यातील भाषेची समस्या नाही मात्र त्याच्या टोनबद्दल माझी तक्रार आहे.’ पूनावाला सध्या लंडनमध्ये आहेत. भारतीय नागरिकांनी प्रवास करण्याच्या बंदीच्या आठ दिवस आधी ते ब्रिटनमध्ये दाखल झाले.

ते पुढे म्हणाले, ‘मी लंडनमध्ये जास्त काळ राहणार आहे. मला त्या परिस्थितीमध्ये परत जायचे नाही. माझ्या खांद्यावर फार मोठे ओझे आहे व हे मी एकटा करू शकणार नाही. मुळात आपण एखाद्याला लस पुरवू शकलो नाही म्हणून ती व्यक्ती काय करेल याबाबतचा अंदाज मला लावत बसायचे नाही.’ या मुलाखतीमध्ये असे प्रतीत झाले की, पूनावाला भारताबाहेर कोरोना लस कोव्हिशिल्ड तयार करण्याची योजना आखत आहे. पूनावाला यांनी द टाईम्सला सांगितले की, कंपनी अन्य देशांमध्ये अ‍ॅस्ट्रॅजेनेका लस तयार करण्याच्या योजनेवर काम करत आहे. (हेही वाचा: कोविड-19 रुग्णांसाठी Rahul Gandhi यांनी लॉन्च केली 'Hello Doctor' हेल्पलाईन)

असा विश्वास आहे की कच्च्या मालाच्या पुरवठ्यात अडचणी आल्यामुळे कंपनी हे नियोजन करीत आहे. जगातील सर्वात मोठी लस उत्पादक सीरमही मागणीनुसार पुरवठा करण्यास असमर्थ आहे, ही बाब लक्षात घेऊन कंपनी देशाबाहेरही लस बनवण्याचा विचार करीत आहे. सरकारने 18 वर्षांवरील लोकांना लस देण्याचा निर्णय घेतल्यानंतर तर लसीची मागणी मोठ्या प्रमाणात वाढली आहे.