MHADA Book My Home | (Photo credit: archived, edited, representative image)

MHADA Online Application: घर वाटप प्रक्रिया सुलभ करण्यासाठी, महाराष्ट्र गृहनिर्माण आणि क्षेत्र विकास प्राधिकरण (MHADA ) च्या एकक असलेल्या कोकण गृहनिर्माण आणि क्षेत्र विकास मंडळाने (Konkan Housing Board) मुंबई महानगर प्रदेशातील विविध ठिकाणी 13,395 न विकल्या गेलेल्या फ्लॅट्सच्या विक्रीसाठी एक ऑनलाइन पोर्टल - बुक माय होम (Book My Home Portal) - सुरू केले आहे. म्हाडाचे उपाध्यक्ष आणि सीईओ संजीव जयस्वाल यांच्या हस्ते बुधवारी या पोर्टलचे अधिकृत उद्घाटन करण्यात आले, ज्याचा उद्देश फ्लॅट वाटप प्रक्रिया अधिक पारदर्शक, सुलभ आणि वापरकर्ता-अनुकूल करणे आहे.

‘बुक माय होम’ पोर्टलमध्ये नवीन काय आहे?

म्हाडाच्या या नव्या सेवेबद्दल माहिती देताना कोकण मंडळाच्या मुख्य अधिकारी रेवती गायकर म्हणाल्या की, ‘बुक माय होम’ पोर्टल ही नवीन प्रणाली पूर्वीच्या एकात्मिक गृहनिर्माण लॉटरी व्यवस्थापन प्रणाली (IHLMS) 2.0 ची जागा घेते, जी अर्जदारांना प्रथम येणाऱ्यास प्राधान्य (FCFS) मॉडेल अंतर्गत विशिष्ट फ्लॅट्स निवडण्याची परवानगी देत ​​नव्हती. ही सेवा वापरण्यासाठी https://bookmyhome.mhada.gov.in या संकेतस्थळास आपण भेट देऊ शकता. (हेही वाचा, Mumbai MHADA Lottery 2025: मुंबईकरांसाठी खुशखबर! दिवाळीत निघणार म्हाडाच्या 5 हजार घरांची लॉटरी; जाणून घ्या महत्त्वाच्या तारखा, नोंदणी आणि इतर माहिती)

नव्या पोर्टलची वैशिष्ट्ये

कोकण मंडळाच्या मुख्य अधिकाऱ्या रेवती गायकवाड यांनी सांगितले की, यापूर्वी वापरात असलेल्या IHLMS 2.0 प्रणालीमध्ये ‘फर्स्ट कम, फर्स्ट सर्व’ प्रक्रियेत अर्जदारांना विशिष्ट सदनिका निवडण्याची मुभा नव्हती.

नवीन ‘बुक माय होम’ पोर्टलद्वारे आता अर्जदारांना खालील सुविधा मिळणार आहेत:

  1. सदनिकांची माहिती प्रत्यक्ष वेळेत पाहता येणार
  2. मजला व सदनिका क्रमांकानुसार विशिष्ट घर निवडता येणार
  3. योजनेनुसार व सदनिकानुसार तपशील पाहून निर्णय घेता येणार

कोणत्या भागांतील घरे उपलब्ध आहेत?

परिसर प्रकल्प क्षेत्र
विरार बोळींज
पनवेल शिरढोण
ठाणे जिल्हा गोठेघर, खोणी, भांडारली

ऑनलाइन अर्ज प्रक्रिया

  1. पोर्टलला भेट द्या: https://bookmyhome.mhada.gov.in
  2. नोंदणी करा: खालील कागदपत्रांची स्कॅन केलेली प्रत अपलोड करा:

    1. आधार कार्ड
    2. पॅन कार्ड
    3. स्वयंघोषणा पत्र

  3. डिजिटल पडताळणी: सर्व कागदपत्रे यंत्रणेद्वारे पडताळली जातात. मानवी हस्तक्षेप नाही.
  4. सदनिका निवड: उपलब्ध घरे परिसर, मजला आणि क्रमांकानुसार पाहून निवडा
  5. आरक्षण: फर्स्ट कम, फर्स्ट सर्व तत्त्वावर सदनिकेचे आरक्षण निश्चित होते

पात्रता व सवलती

  • (PMAY) वगळता इतर घरांसाठी उत्पन्नाची अट नाही
  • सामान्य, अनुसूचित जाती (SC) व अनुसूचित जमाती (ST) यांच्यासाठी उपलब्ध
  • प्रधानमंत्री आवास योजनेसाठी पात्रतेच्या अटी यथास्थित

म्हाडाची आणखी एक घोषणा: 15 कोटी दस्तऐवज सर्वसामान्यांसाठी खुले

म्हाडाचे मुख्य कार्यकारी अधिकारी संजीव जयसवाल यांनी सोमवारी घोषणा केली की, 15 कोटी अधिकृत दस्तऐवज सार्वजनिकरीत्या ऑनलाइन उपलब्ध करून दिले जाणार आहेत. यामुळे माहितीच्या अधिकाराचा (RTI) अवलंब कमी होईल.

MHADA मुख्यालय, वांद्रे पूर्व येथे नागरिकांसाठी विविध नवीन सेवा सुरू करण्यात आल्या:

  • सिटिझन फॅसिलिटेशन सेंटर (CFC)
  • व्हिजिटर मॅनेजमेंट सिस्टीम (VMS)
  • ऑफिस नेव्हिगेटर सेवा

जयसवाल म्हणाले, 'या उपक्रमामुळे माहिती मिळवणे अधिक सुलभ होईल आणि RTI अर्जांची गरज भासणार नाही.' दस्तऐवज एका आठवड्याच्या आत म्हाडाच्या संकेतस्थळावर अपलोड केले जाणार आहेत. मात्र, संवेदनशील कागदपत्रे सुरक्षित ठेवली जातील.

 

MHADA म्हणजे 'महाराष्ट्र गृहनिर्माण व क्षेत्र विकास प्राधिकरण,' जी महाराष्ट्र सरकारची एक संस्था आहे. ही संस्था राज्यातील नागरिकांना परवडणारी घरे आणि प्लॉट्स उपलब्ध करून देण्यासाठी कार्य करते. MHADA विविध गृहनिर्माण योजनांच्या माध्यमातून, लॉटरी सिस्टमद्वारे निवासस्थानांचे वितरण करते, ज्यामुळे सर्वसामान्य लोकांना त्यांच्या बजेटमध्ये घर खरेदी करण्याची संधी मिळते. तसेच, गृहनिर्माण प्रकल्पांसाठी बांधकाम तंत्रज्ञानाचा विकास व नियोजन MHADA कडून करण्यात येतो.