
मुंबईच्या (Mumbai) गजबजलेल्या रस्त्यांवर, उंच इमारतींच्या सावलीत, एका सामान्य माणसाचे स्वप्न दडलेले आहे, ते म्हणजे ‘स्वतःच्या घराचे’. महाराष्ट्र गृहनिर्माण व क्षेत्र विकास प्राधिकरण (MHADA) त्याच स्वप्नाला प्रत्यक्षात आणण्यासाठी मुंबई म्हाडा लॉटरी 2025 घेऊन येत आहे. यंदा 5,000 परवडणारी घरे मुंबईकरांना मिळणार आहेत, आणि तीही दिवाळीच्या पूर्वी. गोरेगावच्या हिरव्यागार परिसरापासून ताडदेवच्या चकचकीत उंच इमारतींपर्यंत, ही लॉटरी प्रत्येक आर्थिक स्तरातील नागरिकांसाठी आशेचा किरण असेल. शहरातील वाढत्या घरांच्या किमतींमुळे सामान्य नागरिकांना दिलासा मिळावा हा या उपक्रमाचा उद्देश आहे.
म्हाडाचे उपाध्यक्ष संजीव जयस्वाल यांनी सांगितले, मुंबईत प्रत्येकाला घर मिळावे, हा आमचा संकल्प आहे. ही लॉटरी आर्थिकदृष्ट्या दुर्बल (EWS), कमी उत्पन्न (LIG), मध्यम उत्पन्न (MIG) आणि उच्च उत्पन्न (HIG) गटांसाठी खुली आहे. जयस्वाल म्हणाले की, येत्या वर्षात म्हाडाने मुंबईसह संपूर्ण राज्यात 19,497 नवीन घरे बांधण्याचे लक्ष्य ठेवले आहे. एकट्या मुंबईत 5,1999 घरे बांधण्याचे नियोजन आहे. दिवाळीपूर्वी या घरांसाठी लॉटरी प्रक्रिया सुरू केली जाईल.
महत्त्वाच्या तारखा:
- नोंदणी सुरू होण्याची तारीख: 15 सप्टेंबर 2025
- नोंदणीची अंतिम तारीख: 15 नोव्हेंबर 2025
- ऑनलाइन पेमेंटची अंतिम तारीख: 17 नोव्हेंबर 2025
- RTGS/NEFT पेमेंटची अंतिम तारीख: 17 नोव्हेंबर 2025
- मसुदा अर्ज यादी प्रकाशन: 4 डिसेंबर 2025
- अंतिम अर्ज यादी प्रकाशन: 11 डिसेंबर 2025
- लॉटरी सोडतीची तारीख: 13 डिसेंबर 2025
- परतफेड प्रक्रिया सुरू होण्याची तारीख: 20 डिसेंबर 2025
या तारखा कोकण बोर्डाच्या वेळापत्रकानुसार आहेत आणि त्यामध्ये बदल होऊ शकतात. अर्जदारांनी नियमितपणे म्हाडाची अधिकृत वेबसाइट अपडेटसाठी तपासावी.
जाणून घ्या नोंदणी कशी करावी-
- अधिकृत वेबसाइट lottery.mhada.gov.in. ला भेट द्या.
- तुमचा मोबाईल नंबर आणि ईमेल आयडी वापरून साइन अप करा व खाते तयार करा.
- त्यानंतर वैयक्तिक तपशील, उत्पन्न गट आणि आरक्षण श्रेणीसह आवश्यक माहिती द्या.
- पॅन कार्ड, आधार कार्ड आणि उत्पन्नाचा पुरावा यासारखी आवश्यक कागदपत्रे सादर करा.
- एनईएफटी, आरटीजीएस, डेबिट कार्ड किंवा क्रेडिट कार्डद्वारे ऑनलाइन पेमेंट करा.
- सर्व तपशीलांचे पुनरावलोकन करा आणि तुमचा अर्ज सबमिट करा.
अपात्रता टाळण्यासाठी सर्व माहिती अचूक असल्याची खात्री करा. म्हाडाच्या घरांची किंमत बाजारभावापेक्षा खूपच कमी असते, बहुतेकदा ती स्थान आणि आकारानुसार 15 लाख ते 1 कोटी रुपयांच्या दरम्यान असते. मुंबईत घर घेणे हे अनेकांचे स्वप्न आहे, पण खाजगी बांधकाम व्यावसायिकांचे दर सामान्य माणसाच्या आवाक्याबाहेर आहेत. म्हाडाची ही लॉटरी आर्थिकदृष्ट्या कमकुवत वर्ग आणि कमी उत्पन्न गटासाठी परवडणारी घरे देते, तर मध्यम उत्पन्न गट आणि उच्च उत्पन्न गटासाठी प्रीमियम पर्याय उपलब्ध आहेत.