Pune (Photo Credit: Twitter)

महाराष्ट्रात एकीकडे औरंगाबादचे (Aurangabad) नामकरण संभाजीनंगर (Sambhaji Nagar) करण्यात यावे, अशी मागणींनी अधिक जोर धरला आहे. याच मुद्यावरून राज्यातील राजकारणही तापल्याचे दिसत आहे. तर, दुसरीकडे पुणे (Pune) जिल्ह्याच्या नामकरणाची मागणी होऊ लागली आहे. दरम्यान, पुण्याचे नाव बदलून जिजापूर (Jijapur) करण्यात यावे, अशी मागणी संभाजी ब्रिगेडकडून करण्यात आली आहे. "औरंगाबादचे नामांतर संभाजीनगर करण्यास वेळ लागत असेल तर पुण्याला राष्ट्रमाता जिजाऊंचे नाव देऊन या शहराचे नामांतर ‘जिजापूर’ असे करा", अशी मागणी संभाजी ब्रिगेडचे प्रदेश संघटक संतोष शिंदे यांनी केली आहे. या संदर्भात टीव्ही9 मराठीने वृत्त दिले आहे.

बेचिराख झालेले पुणे शहर जिजाऊंनी बसवले आहे. पुण्याला जिजाऊंचा इतिहास आहे. पुणे शहर हे माँसाहेब जिजाऊ आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या शौर्याचे प्रतीक आहे. त्यामुळे नामांतराचे राजकारण करू नका. इतिहासातील प्रतिकांचा आदर करायला शिका, असेही शिंदे म्हणाले आहेत. महत्वाचे म्हणजे, ही मागणी गेल्या 25 वर्षापासून केली जात आहे. याकरिता अनेकवेळा पुणे महानगरपालिकेला आणि राज्य सरकारला पत्र पाठवण्यात आले आहे, अशी माहिती संभाजी ब्रिग्रेडच्या नेत्यांनी प्रसारमाध्यमांना दिली आहे. हे देखील वाचा- BMC Election 2022: मनसे आणि भाजप यांच्या युतीबाबत चंद्रकांत पाटील यांचे मोठे वक्तव्य

औरंगाबादच्या नामकरणाच्या मुद्द्यावरून अनेक राजकीय पक्ष आपली भुमिका मांडताना दिसत आहेत. औरंगाबादचे नामकरण संभाजीनगर व्हावे, यासाठी भाजपकडून अधिक जोर दिला जात आहे. तर, महाविकास आघाडीतील काँग्रेसकडून या नामांतराला विरोध होत आहे. याच वादात आता वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे. तसेच औरंगाबाद ऐवजी पुणे जिल्ह्याचे नाव संभाजीनगर करावे, अशी मागणी त्यांनी केली आहे.